टीईटी परीक्षा ऑगस्टपूर्वी होणे अशक्य

नवी दिल्ली/29 जून-सर्वोच्च न्यायालयाने नोकरीत कायम राहण्यासाठी ऑगस्ट 2028 पर्यंत टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. या कडक डेडलाईनमुळे यंदा विक्रमी अर्ज आले होते. एकूण 6 लाख अर्जदारांपैकी तब्बल 3 लाख 46 हजार अर्ज हे सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांचे आहेत (अनेक शिक्षकांनी दोन्ही पेपरसाठी अर्ज केल्याने ही संख्या 3.46 लाख आहे, तर प्रत्यक्ष शिक्षक उमेदवारांची संख्या 2 लाख 26 हजार आहे). परीक्षा लांबणीवर पडल्यामुळे या शिक्षकांवर नोकरी गमावण्याची टांगती तलवार अधिक गडद झाली आहे
छत्रपती संभाजीनगर : राज्य परीक्षा परिषदेने ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ रद्द केल्यानंतर रविवारी राज्यातील सर्व जिल्हास्तरावरून कोर्‍या सुमारे सहा लाख उत्तरपत्रिका जमा करून घेतल्या. रद्द करण्यात आलेली परीक्षा पुन्हा घेण्याच्या तयारीसाठी परिषदेला किमान दोन महिन्यांचा कालावधी लागेल, असे अधिकारीसूत्रांनी सांगितले. परीक्षा लांबणार असल्याने परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या दोन लाख 26 हजार शिक्षकांची धाकधूक वाढली आहे.
पेपरफुटीचा रद्द करण्यात आली. राज्यातील सहा लाख 125 विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे. पेपरफुटीनंतर परिषदेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची रविवारी बैठक झाली. परीक्षा पुन्हा घेण्यासह विविध विषयांवर चर्चा झाल्याचे अधिकारीसूत्रांनी सांगितले. परीक्षेच्या काही तास आधी पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तोपर्यंत परीक्षा केंद्रावर परीक्षेचे साहित्य पोहचले, परीक्षा कक्षात बैठक क्रमांकही लिहण्यात आले होते. पेपर रद्दची माहिती मिळाल्यानंतर प्रक्रिया थांबवण्यात आली होती. आता पुन्हा पेपर घेण्यासाठीची तयारी करण्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागेल, असे सांगण्यात येते. नवीन प्रश्नपत्रिका तयार करणे, छपाईबाबत गोपनीयता राखणे यासह नवीन तारखेचे नियोजन, त्यादरम्यान इतर परीक्षा नसणे हे पाहणे, परीक्षा केंद्रांची उपलब्धता, पाऊस या सर्व गोष्टींचा अभ्यास करून परीक्षेची तारीख ठरवावी लागणार असल्याने हा कालावधी लागेल असे सांगण्यात येते. दरम्यान, रविवारी परिषदेने राज्यातील 37 परीक्षा जिल्हा नियोजन केंद्रांवरून सर्व उत्तरपत्रिका जमा करून घेतल्या.राज्यातील महाटीईटी परीक्षेला सहा लाख 125 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये शिक्षकांची नोंदणी लक्षणीय आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2028पर्यंत टीईटी उत्तीर्णतेची मुदत दिल्याने यंदा परीक्षेला शिक्षकांनी विक्रमी नोंद केली. सहा लाखांमध्ये शिक्षकांचे 3 लाख 46 हजार अर्ज आहेत. दोन लाख 26 हजार शिक्षकांचे हे अर्ज असून, यात ‘पेपर-1’च्या तुलनेत ‘पेपर-2’साठी सर्वाधिक अर्ज आहेत.
प्रश्नपत्रिका ट्रेझरीमध्येच राहणार-परिषदेने उत्तरपत्रिका जमा करून घेतल्या आहेत. परंतु जिल्हा ट्रेझरीमध्ये जमा असलेल्या प्रश्नपत्रिका संचाबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘महाटीईटी’ परीक्षेचे प्रश्नपत्रिका संच जिल्हा ट्रेझरीमध्ये सीलबंद आहेत. परीक्षा नियोजनासाठी सुमारे परिषदेला सात ते आठ कोटी रुपयांचा खर्च लागतो. पुन्हा परीक्षा होणार असल्याने खर्चाचा भुर्दंड परिषदेला बसणार असल्याचीही चर्चा आहे. परीक्षा नियोजनाची तयारी परिषदेकडून झाली होती. परीक्षा केंद्रावर ‘सीसीटीव्ही’सह विद्यार्थ्यांची तपासणीसाठीची यंत्रणा पोहचली होती. यासह प्रश्नपत्रिका छपाई, प्रश्नपत्रिका संच, उत्तरपत्रिकांची ने-आण करण्यासाठीचा खर्च होणार असल्याचे सांगण्यात येते.

संबंधित बातम्या

Back to top button