महावितरणच्या निष्काळजीपणाने तीन दुधाळ म्हशी ठार

शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान, भरपाईची मागणी

अचलपूर / 8 सप्टेंबर : अचलपूर तालुक्यातील वडगाव फत्तेपुर येथे महावितरणच्या निष्काळजीपणामुळे एक गंभीर घटना घडली असून दूध उत्पादक शेतकरी राजाजी शंकरजी येवले यांचे मोठे नुकसान झाले आहे. गावाजवळील जंगल परिसरात चरण्यासाठी गेलेल्या त्यांच्या म्हशींवर दुर्दैवी मृत्यू कोसळला.
गावाजवळील रोहित्रावरील विद्युत वाहिनीचा तुटलेला तार जमिनीवर पडलेला होता. चरताना म्हशींचा त्या तारेला स्पर्श होताच एकामागोमाग तीन म्हशी ठार झाल्या. या अपघातामुळे शेतकर्‍याचे अंदाजे 2 लाख 25 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय एक गाय व आणखी एक म्हैस गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर परिसरातील शेतकरी व पशुपालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गावकर्‍यांनी महावितरणच्या निष्काळजी कारभारावर कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली.
पशुपालक येवले यांनी तिन्ही मृत म्हशींच्या योग्य व तातडीच्या भरपाईची मागणी महावितरणकडे केली आहे. या दुर्घटनेबाबत महावितरण प्रशासन कोणती भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button