मेडीकल कॉलेजला अ‍ॅडमिशन करुन देतो, महिलेची 29 लाखाने फसवणूक

डॉक्टरांसह 7 जणांवर गुन्हे दाखल,डॉ.संतोष साहानी यांचा समावेश

इंदूरमध्ये मेडीकल अ‍ॅडमिशनचा स्कॅम, गाडगेनगर पोलिसांची कारवाई

अमरावती/22 जुलै- एमबीबीएससाठी मेडीकल कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन मिळवून देण्याच्या नावाखाली एका महिलेची आर्थिक फसवणूक करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अमरावतीच्या गाडगेनगर पोलीसांनी इंदूरच्या मेडीकल स्कॅम करणार्‍या टोळीला अटक केली आहे. इंदुर येथील आरोपींनी गृहिणीकडून तब्बल 29 लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून इंदूर येथील एका डॉक्टरासह 7 जणांनी ही मोठी रक्कम बळकावली असल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून गाडगे नगर पोलिसांनी सातही जणांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमांन्वये कायदेशीर गुन्हा दाखल केला असून, पोलीस या प्रकरणाचा कसून शोध घेत आहेत.अमरावती शहरातील ओम् कॉलनी शेगाव आठवड्या रोड परिसरातील 43 वर्षीय गृहिणीने गाडगे नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेने 1 जुलै रोजी आपल्या मुलीला एमबीबीएस अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून देण्याबाबत सौरभ गुप्ता, अमन कुमार, रणधीर कुमार, सतीश गोस्वामी, निखिल सिंग, चंदन चौधरी आणि डॉक्टर संतोषी साहनी यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. हे सर्व आरोपी इंदूरमधील साऊथ तुकोगंज मालवीय नगर येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. आरोपींनी बोगस प्रवेशाचे आश्वासन देऊन महिलेकडून रोख रक्कम आणि ऑनलाईन फोन पेच्या माध्यमातून एकूण 29 लाख 10 हजार रुपये उकळले. मात्र, बरीच प्रतीक्षा करूनही मुलीचा वैद्यकीय प्रवेश काही झाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने 21 जुलैच्या दुपारी गाडगे नगर पोलीस ठाण्यात गाठून या गंभीर फसवणुकीची अधिकृत तक्रार नोंदवली. पोलिसांनी डॉक्टर संतोषी साहनीसह सातही जणांवर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक सुष्मा आटवले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली जिल्ह्यात अशा प्रकारची फसवणूक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. वास्तविक पाहता वैद्यकीय महाविद्यालयातील विशेषतः एमबीबीएसचे सर्व प्रवेश हे नीट परीक्षेच्या गुणांवर व गुणवत्तेवर आधारलेले असतात आणि प्रवेशाचे कट ऑफ केवळ त्याच निकषांवर ठरतात.
वैद्यकीय प्रवेशाचा सावळा गोंधळ-एमबीबीएस शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने इंदूरच्या भामट्यांनी अमरावतीच्या एका कुटुंबाची तब्बल एकोणतीस लाखांची फसवणूक केली आहे. डॉक्टरसह सात जणांवर गाडगे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, नीट परीक्षेच्या गुणवत्तेशिवाय होणार्‍या अशा प्रलोभनांना पालकांनी वेळीच सावध राहणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या

Back to top button