शहानूर धरणाचे 4 दरवाजे उघडले

14.28 घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग

-नदीकाठच्या गावांमध्ये खबरदारीच्या सूचना
अमरावती / 26 ऑगस्ट : जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये गणणा होणार्‍या शहानूर प्रकल्पात पाण्याची सतत वाढती आवक आणि जलस्तर वाढत असल्यामुळे आज सकाळी 8.30 वाजता प्रकल्पाचे 4 दरवाजे 5 सेंटीमीटरने उघडण्यात आले. यामुळे शहानूर नदीत आता प्रति सेकंद 14.28 घनमीटर पाणी सोडले जात आहे. प्रकल्प प्रशासनाने या पाण्याचा विसर्ग सुरु करण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाला याबाबत आधीच माहिती दिली होती, तसेच नदीकाठच्या गावांमध्ये रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
सकाळी 7 वाजता शहानूर प्रकल्पात जलस्तर 446.38 मीटर इतका पोहोचला होता आणि 81.64 टक्के जलसंग्रहण झाल्याचे नोंदवण्यात आले. सामान्यपणे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जलाशयात अपेक्षित जलस्तर 445.05 मीटर आणि जलसंग्रहण 75.11 टक्के असते. प्रकल्प प्रशासनाने सांगितले की, सध्या पावसामुळे जलाशयात होणारी पाण्याची आवक आणि वाढत्या जलसंग्रहण लक्षात घेता, आवश्यक असल्यास प्रकल्पाचे इतर दरवाजे देखील उघडून विसर्ग वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये रहिवाशांनी पूर्ण खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा जल प्रकल्पात सध्या 88.72 टक्के जलसंग्रहण झाले आहे. प्रकल्पात जलस्तर 341.78 मीटर असून, 614.66 दशलक्ष घनमीटर पाणी साठलेले आहे. रोज सरासरी 5.06 दशलक्ष घनमीटर पाणी आवक होत असून, जर जलस्तर आणि जलसंग्रहण वाढत राहिले, तर अप्पर वर्धा प्रकल्पातील 13 दरवाजांपैकी काही दरवाजे उघडून वर्धा नदीत पाणी सोडले जाऊ शकते. नदीकाठच्या गावांमध्ये रहिवाशांनी घराबाहेर जाणे टाळावे, पाणी येण्याची शक्यता असल्यास आवश्यक ती तयारी करावी आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, अशा सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button