राजकमल पुलाची जर्जर अवस्था : नवा पूल तात्काळ गरजेचा!

थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्टने उघडली गंभीर अवस्था

-गंज, भेगा, झिरपणारे पाणी यामुळे पूल कमकूवत
-सुरक्षा बॅरियर्स मोडकळीस, रेलिंग गहाळ
-धोक्याचा इशारा, पण दुर्लक्षाची सवय
अमरावती / 26 ऑगस्ट : शहराच्या मध्यभागी उभा असलेला राजकमल रेल्वे उड्डाणपुल आता गंभीर धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. तज्ज्ञांच्या थर्ड पार्टी स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टने स्पष्ट केले की, पूलाची संपूर्ण रचना असुरक्षित झाली आहे. डेक स्लॅब झडलेले, लोखंडी सळया गंजलेल्या, स्टील गर्डर्स खराब, बियरिंग्स विस्कटलेल्या आणि सुरक्षा बॅरियर्स मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहेत. या सर्व तांत्रिक दोषांमुळे नव्या पुलाचा पर्याय तात्काळ राबवणे हाच एकमेव सुरक्षित उपाय आता उरला आहे.
राजकमल रेल्वे उड्डाणपुल म्हणजे एकेकाळी विकासाचे प्रतीक होता. मात्र आज त्याची अवस्था अशी झाली आहे की, हा पूल प्रवासासाठी असुरक्षित आहे, हा पूल तोडून नवा बांधणे हाच एकमेव पर्याय आहे. सहा दशकांच्या प्रवासानंतर पुलावर गंज, भेगा, झिरपणारे पाणी, मोडकळीस आलेली रचना आणि ढासळलेली सुरक्षा यंत्रणा, हेच वास्तव थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्टने उघड केले आहे. 1963 मध्ये बांधलेल्या या पुलाची योग्यवेळी दुरुस्ती व देखभाल न झाल्याने आज तो कचाट्यात सापडला आहे. आरसीसी स्लॅब झडून लोखंडी सळया गंजल्या, स्टील गर्डर्सवर खोलवर पिटींग, सैल झालेले बोल्ट, विस्कटलेले बियरिंग्स, तुटलेले ड्रेनेज, ही केवळ तांत्रिक माहिती नाही, तर प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे ज्वलंत पुरावे असल्याचे बोलले जात आहे.
विजुअल इन्स्पेक्शन आणि नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टमध्ये जे निष्कर्ष समोर आले, ते अंगावर काटा आणणारे आहेत. डेक स्लॅबची क्षमता संपली, सळया 90 टक्के गंजल्या, पाणी झिरपत आहे, बॅरियर्स मोडकळीस आले आहेत. यानंतरही जर कुणी पूल वापरता येईल असे म्हणत असेल, तर तो लोकांच्या जीवाशी खेळ असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. राजकमल उड्डाणपुल हा फक्त काँक्रीट-लोखंडाचा ढाचा नाही; तो शहराच्या सुरक्षेशी जोडलेला प्रश्न आहे. पुलाची अवस्था इतकी ढासळली असताना वेळेवर उपाययोजना न करणारे अधिकारी व राजकीय प्रतिनिधी, हेच या परिस्थितीसाठी खरे दोषी आहेत. नागरिकांच्या जीवाशी खेळून प्रशासन किती दिवस जबाबदारी टाळणार? असा संताप शहरवासीय व्यक्त करित आहेत. लवकरात लवकर नवा पूल उभा राहावा आणि त्यासाठी जबाबदार यंत्रणांनी कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्ष कामगिरी दाखवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-पूल बंद पण नागरिकांचे काय?
रविवारी रात्री अचानक पूल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी शहरात वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला. नागरिक त्रस्त झाले. याबाबत सोशल मीडियावर रोष व्यक्त केला जात आहे. जबाबदार अधिकार्‍यांना हे सर्व आजच कळले का? की रिपोर्ट आधीपासूनच माहित होता आणि त्याकडे डोळेझाक करण्यात आली? असे प्रश्न अमरावतीकरांकडून उपस्थित केले जात आहेत.
-जवाबदारी टाळण्याची परंपरा
या पुलाची दुरुस्ती, देखभाल, वेळोवेळी निरीक्षण यासाठी जबाबदार कोण? महानगरपालिका, रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग, वा मंडळ प्रशासन? सर्वांकडून कागदोपत्री दाखले मिळतील, पण प्रत्यक्षात कोणालाच जबाबदारी घ्यायची नाही. हाच प्रशासकीय रोग आहे आणि तोच आज जीवघेणा ठरत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.
-मॅजिक कन्स्ट्रक्शनकडून पाहणी व चाचण्या
मॅजिक कन्स्ट्रक्शनच्या डॉ. एम.व्ही. मोहोड व टीमने पुलाचे विजुअल इन्स्पेक्शन आणि नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट्स त्यात हॅमर टेस्ट, अल्ट्रासोनिक पल्स व्हेलोसिटी, हाफसेल पोटेंशियल, कोरोजन टेस्ट करून पाहिले. त्यांनी या पूलाची आता अतिरिक्त ताण सहन करण्याची क्षमता राहीलेली नाही, असा निष्कर्ष काढला आहे. अंतरिम उपायांनी काही काळ पुलाचा वापर करता येईल, पण सुरक्षितता सुनिश्चित करता येणार नाही. असा गंभीर इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

Back to top button