आत लग्नपत्रिकेत वधू-वरांच्या जन्मतारखांची नोंद आवश्यक
बालविवाहाला लगाम लावण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

मुंबई/24 जून– राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसर्या दिवशी विविध मुद्द्यांवरून विरोधक आणि सत्ताधारी सदस्य आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या वेळी आमदार अतुल भातखळकर यांनी राज्यात बालविवाहाची अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी प्रभावी मोहीम राबविण्याबाबतचा प्रश्न मांडला.
या चर्चेत काँग्रेस नेते तथा आमदार नाना पटोले यांनी सुद्धा सहभाग घेतला. या प्रश्नाला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिले. महत्त्वाची बाब म्हणजे, मंत्री तटकरे यांनी राज्यातील बाल विवाहाची एकूण आकडेवारी सांगत राजस्थान सरकारचा उपक्रमाच्या अभ्यास करून तो उपक्रम महाराष्ट्रात राबवण्याचा आणि लग्नपत्रिकेत वधू-वरांच्या जन्मतारखा नमूद करण्याचा नियम करण्यात येणार असल्याची माहिती दिली. राज्याच्या कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019 ते 2021 या कालावधीत देशातील बालविवाहाचे प्रमाण 23.3 टक्के होते, तर महाराष्ट्रात ते 21.9 टक्के होते. 2023-24 मधील निवडक जिल्ह्यांच्या सर्वेक्षणात देशाची सरासरी 20.1 टक्क्यांवर आली आहे. महाराष्ट्रात बालविवाहाचे प्रमाण घटून 19.7 टक्क्यांवर आले आहे. मंत्री तटकरे म्हणाल्या की, बालविवाह रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाची कारवाई अधिक प्रभावी करण्यात येत असून गुन्हे नोंदविण्याचे प्रमाणही वाढले आहे. राज्यात जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कृती दल, ग्राम संरक्षण कक्ष आणि तालुका व ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणा कार्यरत आहे. त्यांना अधिक सक्षम करण्याचे काम सुरू आहे. बालविवाहात सहभागी होणारे दोन्ही कुटुंबीय, संबंधित व्यक्ती आणि सहभागी ग्रामस्थांविरुद्धही गुन्हे दाखल केले जात असल्याने प्रतिबंधात्मक कारवाई अधिक प्रभावी ठरत आहे.




