परिवहन मंत्र्यांच्या मध्यस्तीने आरटीओचा संप मिटला
वाहतूक कोंडी फुटली; सर्व सेवा पूर्ववत

जनतेच्या सोयीसाठी कर्मचारी संघटना नमली
अमरावती /24 जून- गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला राज्यभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) कर्मचार्यांचा बेमुदत संप अखेर मिटला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी सकारात्मक चर्चा केल्याने हा तिढा सुटला असून, आजपासून राज्यभरातील सर्व कार्यालयांत कामकाज पुन्हा सुरू झाले आहे.
या संपामुळे वाहन नोंदणी, परवाना आणि कर वसुलीसह महत्त्वाची कामे ठप्प झाल्याने नागरिकांचे हाल होत होते. मात्र, आता कामे पूर्ववत झाल्याने वाहनधारक आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सेवा प्रवेश नियम, पदोन्नती, वेतन बदल, थेट भरती आणि आश्वासित प्रगती योजनेसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचार्यांनी 16 जूनपासून कामबंद आंदोलन पुकारले होते. संपकाळात अनेक आ. आणि खा. यांनी परिवहन मंत्र्यांकडे कर्मचार्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले होते. माध्यमांनीही हा प्रश्न लावून धरल्याने सरकारवर दबाव वाढला होता. सोमवारी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत प्रताप सरनाईक यांनी संघटना पदाधिकार्यांशी सविस्तर चर्चा केली. यामध्ये पदोन्नती संबंधीच्या मुद्द्यांवर त्वरित कार्यवाही करण्याचे आणि अन्य मागण्यांवर ठराविक कालावधीत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच परिवहन आयुक्त स्तरावरील प्रलंबित प्रकरणांच्या निवारणासाठी विशेष बैठक घेण्याचेही मान्य केले. शासनाकडून मिळालेल्या आश्वासनांनंतर संघटनेने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. आता सर्व आरटीओ कार्यालयांमध्ये प्रलंबित अर्ज आणि प्रकरणांची प्राथमिकता देऊन निपटारा केला जाणार आहे. यामुळे वाहन मालक, विक्रेते आणि आरटीओ सेवांसाठी प्रतीक्षा करत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यभरातील सर्व कार्यालयांत सेवा नेहमीप्रमाणे सुरू झाल्या असून, या संपामुळे रखडलेल्या सरकारी महसूल वसुलीलाही आता गती मिळणार आहे. संघटना शासनाच्या आश्वासनांच्या कालबद्ध अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करणार आहे.




