नरभक्षक बाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, दुसरा बेपत्ता
मेळघाटच्या कुलंगणा जंगलातील घटना

-परिसरात खळबळ व दहशत
अमरावती / 19 ऑगस्ट : चिखलदर्यातील कुलंगणा जंगल परिसर सोमवारी भीषण घटनेचा साक्षीदार ठरला. जनावरे चारण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन गुराख्यांवर झुडुपांत दबा धरून बसलेल्या नरभक्षक बाघाने हल्ला केला. प्रवीण सुखराम बेलसरे (17) याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा साथीदार गोविंद गोपाल कास्बेकर (17) हा अद्याप बेपत्ता आहे. जंगलात एकाएकी झालेल्या या हल्ल्यामुळे गावकर्यांमध्ये दहशत पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण व गोविंद हे दोघे रोजच्याप्रमाणे सकाळी जनावरे घेऊन जंगलात गेले होते. त्यावेळी झुडुपांत लपून बसलेल्या बाघाने अचानक झडप घालत प्रवीणचा बळी घेतला. त्याचे क्षतविक्षत शरीर ताब्यात घेण्यात आले. गोविंदचा मात्र काहीही मागमूस लागलेला नाही. बाघ त्याला जंगलाच्या आत ओढून नेल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार राजकुमार पटेल यांनी व्याघ्र प्रकल्पाचे सीसीएफ आदर्श रेड्डी व चिखलदरा पोलिसांना संपर्क साधला. तत्काळ संयुक्त पथक घटनास्थळी दाखल झाले. रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून, जंगलात शोधमोहीम राबवली जात आहे. मृतकाच्या कुटुंबियांकडून आक्रोश करण्यात येत होता.
या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाघाचे हल्ले वाढत आहेत, पण ठोस उपाययोजना होत नाहीत. रोज जनावरे व माणसं धोक्यात आहेत, असे ग्रामस्थांनी सांगितले. आमच्या मुलांना जंगलात जनावरे चारायलाच जावं लागतं, मग अशा हल्ल्यांत बळी गेले तरी जबाबदार कोण? असा प्रश्न मृतकाच्या नातेवाईकांनी उपस्थित केला. वनविभागाने या घटनेनंतर रेस्क्यू पथक घटनास्थळी पाठवले असले, तरी स्थानिकांच्या दृष्टीने ही कारवाई उशिरा झाल्यासारखी आहे. याआधीही मेलघाटात अल्पावधीतच 4-5 हल्ल्यांत चरवाह्यांचा बळी गेला आहे. वाघ मानवसंहारक ठरत असतानाही त्याचे बंदोबस्त करण्यात झालेल्या विलंबामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वी बारुखेडा जंगलात झालेल्या हल्ल्यातही एका गुराख्याचा मृतदेह अनेक दिवसांनीच सापडला होता. वाढत्या घटनांमुळे मेळघाटात भीतीचे सावट दाटले असून, आदमखोर झालेल्या बाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रबळ होत आहे.
-दुर्दैवी योगायोग : कुलंगणाच्या बालकाचा बूडून मृत्यू
कुलंगना खुर्द या गावात वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यु झाल्याच्या घटनेने गाव हादरुन गेले असतानाच दुसरीकडे याच गावात पूरपाण्याने आणखी एक जीव घेतला. आनंद रामकिसन मावस्कर (8) हा बालक नदीच्या पुरात वाहून गेला. त्याचा मृतदेह सापडला असून, गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सकाळीच दोन गुराख्यांवर वााघाचा हल्ला आणि त्याच वेळी पुरात बालकाचा मृत्यू, या दुहेरी संकटाने कुलंगणा परिसर शोकमग्न झाला आहे.




