सबंध भाषणात ट्रम्प, चिनचा उल्लेखच नाही
राहुल गांधींची मोदींवर टीका

-ट्रम्प यांच्या खोटेपणावर बोलायचे होते
नवी दिल्ली/ 29 जुले : भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानला दिलेल्या जोरदार प्रत्युत्तराबाबत आज संसदेत चर्चा पार पडली आहे. ऑपरेशन सिंदूरसंदर्भात चर्चा पार पडत असताना विरोधकांनी सत्ताधार्यांना ऑपरेशन सिंदूरवरून आणि भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवरून अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्या प्रश्नांना आज (29 जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानकडून देण्यात आलेल्या अणुबॉम्बच्या धमक्यांबाबतही मोदींनी स्पष्टीकरण दिलं. तसेच ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताला कोणत्या देशांनी पाठिंबा दिला होता, याचीही माहिती त्यांनी सांगितली.
दुसरीकडे लोकसभेतील भाषणावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. सबंध भाषणात मोदींनी मी सीसफायर घडवून आणलं असं वारंवार सांगणार्या अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युद्धात पाकिस्तानला प्रत्यक्ष मदत करणार्या चिनचा एकदाही उल्लेख केला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आणि त्यावरुन पंतप्रधानांवर निशाना साधला. मोदींनी आपल्या भाषणात भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधी कशी झाली? कोणाचा फोन आला होता? याचाही खुलासा केला. कारण ऑपरेशन सिंदूर डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत सांगावं असं आव्हान राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात दिलं होतं.
त्यावर जगातल्या एकाही नेत्याने ऑपरेशन सिंदूर थांबवा असं आपल्याला सांगितलेलं नाही असं मोदी यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठेही स्पष्ट केलं नाही की डोनाल्ड ट्रम्प हे खोटे बोलत आहेत. तसेच मोदींच्या संपूर्ण भाषणात चीनबाबत एक शब्दही निघाला नसल्याचं खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प 29 वेळा भारत-पाकिस्तानच्या शस्त्रसंधीबाबत बोललेत. मात्र, तरीही मोदींनी त्यावर काहीही स्पष्ट उत्तर दिलेलं नाही.
तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे पंतप्रधान मोदींनी संपूर्ण भाषणात एकदाही चीनचा उल्लेख केला नाही. हे संपूर्ण देशाला माहिती आहे की पाकिस्तानची टेक्निकली एअर फोर्सची मदत चीनने केली. मात्र, तरीही पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्र्यांच्या तोंडून यावर एकही शब्द निघाला नाही, असं खासदार राहुल गांधींनी म्हणाले.




