देवेंद्र फडणवीस दादागिरी करतात, पक्ष फोडतात
हे कुठपर्यंत सहन करायचे?

-यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल
-उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने
अमरावती / 17 जुलै : अधिवेशन संपायच्या आधी वरच्या सभागृहातील विरोधी पक्षनेता त्याठिकाणी नेमला गेला पाहीजे. हा नियम आहे, आम्ही पण नियम जाणतो. पण सगळे नियम बाजूला आणि आमची दादागीरी एकाठिकाणी, अशी चुकीची कार्यप्रणाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवलंबिली आहे. तूम्ही कोणीच काहीही बोलायचे नाही, अशी भानगड देवेंद्र फडणवीस करताहेत. त्यांची दादागिरी किती दिवस सहन करायची, ते पक्ष फोडत आहेत, पक्ष तोडत आहेत. लोकशाहीचा अपमान करताहेत आणि सत्तेत बसताहेत. मत पण त्यांनी विकत घेतलेले आहेत, असे म्हणायला काहीच हरकत नाही. अशा शब्दात काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
जनसुरक्षा विधेयकाविरोधात आज अमरावती शहर काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यावेळी प्रसार माध्यमांशी यशोमती ठाकूर बोलत होत्या. यावेळी त्यांनी शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रशंसा केली. ते जनसामान्यांचा विचार करणारे सालस आणि सरळमार्गी राजकारण करणारे नेते आहेत, असे यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या.
सरकारने पारित केलेले जनसुरक्षा विधेयक सर्वसामान्य नागरिकांची गळचेपी करुन त्यांची गळचेपी करण्यासाठी केले गेलेले षडयंत्र आहे, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली. आज आम्ही या जाचक कायद्याविरोधात निवेदन दिले आहे. मात्र उद्या महाराष्ट्र रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही याप्रकारे दादागिरी या महाराष्ट्रात आणि लोकशाही भारतात करु शकत नाही. हा कायदा लोकशाहीला तडा देणारा कायदा आहे. आम्ही हा कायदा खपवून घेणार नाही. हा कायदा रद्द झालाच पाहिजे, असे यशोमती ठाकूर यांनी सरकारला ठणकावले.
उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीसांनी भाजपसोबत येण्याची ऑफर दिल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस काहीही बोलतील, उद्धव ठाकरेंना माहिती आहे काय करायचे आहे ते. ते तसे सूज्ञ आहेत. जमीनीवर राहणारा सालस आणि जनसामान्यांचा विचार करणारी व्यक्ती उद्धव ठाकरे आहेत. मी ते अनूभवलं आहे. म्हणून त्यांना काय बोलायचं ते बोलू द्यात.
25 वर्षांचा इतिहास सर्वांना माहिती आहे. कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि शिवसेनेचा किती आणि कसा वापर करुन घेतला. शिवसेना कशी हिसकून घेतली आणि शिवसेना कोणी तोडली हे उद्धव साहेबांना चांगल माहिती आहे. असे ठाकूर म्हणाल्या. भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. सगळ्या विचारधारेला आपण सारखा सन्मान देत असतो. आर्टिकल 14 मध्ये राईट टू इक्वलिटी दर्शविलं आहे. राईट टू स्पिच चा संविधानात अधिकार दिला आहे. मग आता तुम्ही विचार करण्याचा अधिकार हिरावून घेत असाल तर ही एकप्रकारची दडपशाही आहे, असा आरोप त्यांनी केला.
तुम्ही एकीकडे हा कायदा आणता आणि दुसरीकडे प्रविण गायकवाडसारख्या बहुजनांचा विचार करणार्या, संभाजी महाराजांच्या विचारांवर चालणार्या कार्यकर्त्यांवर तुमचा कार्यकर्ता हल्ला करतो, त्यांना काळिख फासतो. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येत नाही काय? असा प्रश्नही ठाकूर यांनी उपस्थित केला. संभाजी ब्रिगेडच्या लोकांना अडवायचे आणि शिवधर्मवाले जे आहेत ते कसेही वागले तरी त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायचे, हे काही बरे नाही. या देशात आणि राज्यात सध्या काय चाललं आहे असा प्रश्न विचारुन अशाप्रकारची दादागिरी महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.




