एमडी ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे गुजरातपर्यंत

अमरावतीतून अंमली पदार्थांच्या तस्करीचे आंतरराज्यीय जाळे उद्ध्वस्त

मध्य प्रदेशातून माल अन् अमरावतीत सौदा

अमरावती / 3 जानेवारी : अमरावतीतून अंमली पदार्थांच्या तस्करीचे एक मोठे आंतरराज्यीय जाळे उद्ध्वस्त करण्यात आले असून, या रॅकेटची पाळेमुळे थेट गुजरात, मुंबई आणि मध्य प्रदेशापर्यंत खोलवर पसरल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नागपूर आणि अहमदाबाद येथील महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) संयुक्त पथकाने रविवारी दुपारी नवसारी परिसरातील एका धाब्यावर अतिशय गुप्त पद्धतीने छापा टाकून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 7 कोटी रुपयांहून अधिक किंमत असलेले 4 किलो 900 ग्रॅम ’मेफेड्रोन’ (एमडी) ड्रग्स जप्त केले. या धडाकेबाज कारवाईत फैजलखान अन्सार खान (रा. गुलिस्ता नगर), आवेद अहमद आरीफ अहमद (रा. चांदूर बाजार), मुस्तकीन खान अब्दुल ताहीर खान (रा. चांदूर बाजार) आणि शेख परवेज शेख नझीर (रा. चांदनी चौक) या चार मुख्य सूत्रधारांना रंगेहात बेड्या ठोकण्यात आल्या. स्थानिक पोलिसांना पूर्णपणे अनभिज्ञ ठेवून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, अमरावती शहर आता ड्रग्स तस्करीचे मुख्य केंद्र बनल्याचे निष्पन्न झाले आहे.
तपासातून समोर आलेली माहिती अधिक धक्कादायक असून, गेल्या चार वर्षांपासून अमरावती शहर तस्करांसाठी सर्वात सुरक्षित साठवणूक केंद्र बनले होते. स्थानिक पोलिसांच्या नाकाखाली हा कोट्यवधींचा काळा बाजार सुरू असतानाही गुन्हे शाखा आणि गुप्तचर यंत्रणेला याची साधी कुणकुणही कशी लागली नाही, यावरून आता तर्कवितर्कांना प्रचंड उधाण आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मोबाईलमधील माहितीवरून अनेक बड्या व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता आहे. विशेषतः आवेद आणि मुस्तकीन खान यांचे शहरातील काही हॉटेल व्यावसायिक आणि ’गुटखा किंग’ सोबत असलेले घनिष्ठ संबंध आता तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. केवळ पाकिटांची ने-आण करण्याचे काम असल्याचे आरोपी सांगत असले, तरी या आंतरराज्यीय रॅकेटची व्याप्ती मोठी असून यामागे एखादा मोठा राजकीय वरदहस्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. न्यायालयात हजर केले असता या चौघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, डीआरआयचे पथक आता या प्रकरणातील ’बड्या माशांचा’ आणि त्यांना मिळणार्‍या छुप्या पाठिंब्याचा कसून शोध घेत आहे.
मध्य प्रदेशातून माल अन् अमरावतीत व्यवहार-या तस्करीचे नियोजन अतिशय नियोजनबद्ध होते. तस्करांनी मध्य प्रदेशातील विविध भागांतून तुकड्या-तुकड्यांत हा माल गोळा केला होता. मुंबईत झालेल्या एका प्राथमिक बैठकीत पाच किलो मेफेड्रोनची मागणी नोंदवण्यात आली होती. त्यानुसार शनिवारीच अमरावतीत तळ ठोकून असलेल्या महसूल पथकाने तस्करांच्या प्रत्येक हालचालीवर गुप्त नजर ठेवली आणि रोख रकमेसह आलेल्या गिर्‍हाईकाला पकडून या काळ्या धंद्याचा पर्दाफाश केला.

संबंधित बातम्या

Back to top button