जयहरी विठ्ठल च्या जयघोषात दहीहंडी जल्लोशात

कौंडण्यपूरात रंगला सोहळा

-वारकर्‍यांमध्ये प्रचंड उत्साह
-दह्याच्या प्रसादाची उधळन
तिवसा / 11 जुलै: माता रुक्मिणीचे माहेरघर असलेल्या कौंडण्यपुरात आज शुक्रवारी, 11 जुलै रोजी दुपारी 4 वाजता आषाढी पौर्णिमेच्या निमित्ताने जयहरी विठ्ठल व विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोषात भव्य-दिव्य असा दहीहंडी सोहळा पार पडला. या दहीहंडी सोहळ्यादरम्यान वारकर्‍यांवर दह्याचा प्रसाद उधळण्यात आला. या सोहळ्याच्या निमित्ताने विदर्भाच्या या प्रती पंढरपूरात वारकर्‍यांचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. चाळीस दिवसांचा पायदळ प्रवास करुन विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर पंढरपूरहून परतलेल्या पालखीचे आज दुपारी 12 कौंडण्यपूरात आगमन झाले. यावेळी पालखीचे रुक्मिणी माता संस्थानचे विश्वस्त व तिवस्याचे नायब तहसीलदार आशिष नागरे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
आषाढी एकादशीनिमित्त कौंडण्यपुरातून माता रुक्मिणीची पालखी व पादुका पंढरपूरात नेण्याची प्राचिन परंपरा आहे. यंदा या पालखी सोहळ्याला 431 वर्ष पूर्ण झाली. पंढरपूरात या पालखीला विशेष मान आहे. माता रुख्मिणी संस्थानचे विश्वस्त व शेकडो वारकर्‍यांच्या उपस्थितीमध्ये जवळपास चाळीस दिवसांच्या पायदळ प्रवासासाठी टाळ, मृदुंग आणि विठुरायाचा जयघोष करित पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होते. आज चाळीस दिवसानंतर ही पालखी रुक्मिणीच्या दरबारात दाखल होताच वारकर्‍यांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.
आषाढी एकादशीनिमित्त कौंडण्यपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी संस्थानच्यावतीने भागवत, कीर्तनासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडी सोहळ्यात माजी खासदार नवनीत राणा, भाजपचे जिल्हा अध्यक्ष रविराज देशमुख, आरती राजेश वानखडे, छाया दंडाळे, युवा स्वाभिमानचे कार्याध्यक्ष धीरज केने सहभागी झाले होते. चाळीस दिवसाचा पायदळी प्रवास करून परतलेल्या या पालखी सोहळ्याचे सोहळा प्रमुख म्हणून सदानंद साधू, पालखी प्रमुख सुरेश चव्हाण, पालखी चालक कीर्तनकार पंकज महाराज मोहल्ले, नियोजन प्रमुख अशोक पवार, उपाध्यक्ष वसंतराव डाहे, विश्वस्त अतुल ठाकरे यांनी काम पाहिले.

संबंधित बातम्या

Back to top button