‘ते’ खासदार गद्दार म्हणून ओळखले जातील

डिलिमीटेशन बिलावरून राऊतांचा पुन्हा हल्लाबोल

मुंबई /27 नोव्हेंबर: महिला आरक्षण आणि लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. लोकसभेतील खासदारांची संख्या सध्याच्या 543 वरून थेट 850 पर्यंत वाढवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. यासोबतच महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी घटनादुरुस्ती विधेयक पुन्हा संसदेत मांडण्याची सरकारची तयारी असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला असून, या अधिवेशनात महत्त्वाच्या घटनादुरुस्ती विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या बिलाला पाठिंबा देणार्‍या खासदारांवर आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज शुक्रवारी (27 नोव्हेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या मुद्द्यावरून खासदारांवर आणि केंद्र सरकारवर टीका करताना म्हटले की, मुळात हे महिला आरक्षण विधेयक नाही, ते आधीच मंजूर झालेले आहे. ते मंजूर झाल्याबद्दल मोदींचे सर्वांनी अभिनंदन केले आहे, स्वतः मोदींनी स्वतःचे अभिनंदन केले आहे. हे महिला आरक्षण विधेयक अजिबात नाही. महिला आरक्षण विधेयकाच्या नावाखाली मतदारसंघ पुनर्रचना विधेयक (डिलिमेटशन बिल) जे बदनाम झाले आहे, ते लादण्याचा हा प्रकार आहे. 540 खासदारांच्या जागी साधारण 850 ते 860 खासदार लोकसभेत कोंबायचे. यासाठी चाललेला हा खटाटोप आहे. 2029 ला भाजपचा पराभव होतोय, आतापर्यंत ईव्हीएम, मग व्होटचोरी या दोन्ही कारस्थानांचा वापर करून हे विजयी झाले. आता या दोन्ही प्रकरणांमध्ये त्यांचा भांडाफोड झाल्यामुळे आता डिलिमिटेशन म्हणजे 850 ते 860 खासदार आणून आपल्या मनाप्रमाणे मतदारसंघाची रचना करायची किंवा मतदारसंघ तोडायचे आणि पुन्हा 2029 ला लोकसभेत यायचे आणि मग परत जायचेच नाही, या पद्धतीने ही रचना करणार आहेत, असा दावा राऊतांनी केला आहे.तसेच, 860 खरंतर ही गरज नाही. काही लोकांना चंद्रावर बसवावे लागेल. अशी परिस्थिती आहे, असे टीकास्त्र राऊतांनी डागले. त्यांच्याकडे बहुमत नव्हते.

Back to top button