सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा
19 पैकी 18 जागांवर सहकार विकास पॅनलचा विजय

सोलापूर/27 नोव्हेंबर- सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला असून, भाजपप्रणित सहकार विकास पॅनलने बँकेवर एकहाती सत्ता मिळवली आहे.
संचालक मंडळाच्या एकूण 19 जागांपैकी तब्बल 18 जागांवर या पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी संबंधित स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे सोलापूर जिल्हा बँकेवरील भाजपचे वर्चस्व कायम राहिले आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपप्रणित सहकार विकास पॅनल आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील प्रणित स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनल यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे मतमोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. संचालक मंडळाच्या 19 जागांपैकी भाजपप्रणित सहकार विकास पॅनलने 10 जागा आधीच बिनविरोध जिंकल्या होत्या. त्यामुळे उर्वरित 9 जागांसाठी 26 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. या मतदान प्रक्रियेत 86.94 टक्के मतदानाची नोंद झाली. एकूण 2 हजार 596 मतदारांपैकी 2 हजार 257 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. या निकालात भाजपप्रणित पॅनलने 9 पैकी 8 जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले.





