मतदार हक्कांसाठी काँग्रेसची जनजागृती मोहीम
‘मत वाचवा, देश वाचवा’ अभियानाला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद

मतदार यादी, मतदान प्रक्रियावर नागरिकांशी संवाद
अमरावती /24 नोव्हेंबर- मतदार यादीतील नाव सुरक्षित ठेवणे, मतदानाचा हक्क अबाधित राखणे आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता वाढविण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या वतीने सुरू असलेल्या ‘मत वाचवा, देश वाचवा’ अभियानांतर्गत इतवारा बाजार परिसरात जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान नागरिकांशी संवाद साधून मतदार यादी, मतदार नोंदणी, मतदारांच्या हक्कांचे संरक्षण आणि निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली. मोठ्या संख्येने नागरिकांनी मोहिमेत सहभागी होत आपल्या समस्या, शंका आणि सूचना मांडल्या.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार्या या अभियानात मतदार यादीचे महत्त्व, पात्र मतदारांची नावे यादीत कायम ठेवण्याची प्रक्रिया, नाव वगळले जाण्याबाबत घ्यावयाची काळजी आणि मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक उपाय यांची माहिती देण्यात आली. प्रत्येक नागरिकाने मतदार यादीत आपले नाव तपासावे आणि इतरांनाही याबाबत जागरूक करावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी बबलू शेखावत, मनपा गटनेते विलास इंगोले, पूर्व महापौर मिलिंद चिमोटे, प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार यांच्यासह हाजी राशिद, मौलवी समद कुरैशी, एजाज बासित, अतुल अहमद, अमीन सलात, फहीम शेख, अनिल खिरपे, महमूद हुसेन, नसीम खान, गुड्डू हमीद, डॉ. फिरोज खान, मोहम्मद अमीर शेख, जुबेर खान, सय्यद जावेद आदी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. मतदार हक्कांबाबत प्राधान्य
मतदार यादीतील नाव, मतदानाचा अधिकार आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता याबाबत नागरिकांनी सजग राहणे गरजेचे आहे. प्रत्येक पात्र मतदाराने आपले नाव मतदार यादीत तपासून मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवावा, हाच अभियानाचा मुख्य उद्देश आहे.





