मनोज जरांगे 7 डिसेंबरपासून महाराष्ट्र दौर्‍यावर

4 ते 5 टप्प्यांत राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेटी

मराठा बांधवांशी संवाद साधणार

बीड/23 नोव्हेंबर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गणेशोत्सवाच्या काळात आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनादरम्यान सरकारकडून मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत अपेक्षित निर्णय होत नसल्याने त्यांनी मुंबईच्या दिशेने कूच करण्याचा देखील निर्णय घेतला होता. त्यानंतर सरकारकडून मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा आणि त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न करण्यात आले. अखेर सरकारला काही काळाची मुदत देत मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतले होते. मात्र, त्यानंतरही मराठा समाजाच्या आरक्षणाशी संबंधित प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेले नाहीत. त्यामुळे मनोज जरांगे 7 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्राचा दौरा करणार असून मराठा बांधवांशी संवाद साधणार आहेत. माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन सुरू असतानाच समाजातील अनेक विद्यार्थी, नोकरीसाठी प्रयत्न करणारे उमेदवार आणि नागरिकांना आरक्षणाच्या लाभासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः कुणबी नोंदी उपलब्ध असूनही संबंधितांना प्रमाणपत्र मिळत नाही, अशा तक्रारी समोर येत आहेत. तर काही ठिकाणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही कास्ट व्हॅलिडिटी मिळवण्याच्या प्रक्रियेत अडथळे येत आहेत. त्यामुळे आता केवळ आंदोलनापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जाऊन या समस्यांची माहिती घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे म्हणाले की, या दौर्‍यात प्रत्येक जिल्ह्यासाठी एक दिवस राखून ठेवण्यात येणार आहे. यावेळी संबंधित जिल्ह्यातील मराठा बांधवांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जातील. विशेषतः ज्यांच्या जुन्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, मात्र अद्याप प्रमाणपत्र मिळालेले नाही, अशा नागरिकांच्या प्रकरणांची माहिती घेतली जाणार आहे. तसेच हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे किंवा नाही, प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना कोणत्या अडचणी येत आहेत आणि प्रशासनाकडून काय प्रतिसाद मिळत आहे, याचाही आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती जरांगे यांनी दिली. मनोज जरांगे म्हणाले की, 7 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा दौरा केला जाईल. यासंदर्भात महाराष्ट्र दौर्‍याचा सविस्तर कार्यक्रम 1 डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांचा समावेश करण्याच्या दृष्टीने दौर्‍याचे चार ते पाच टप्प्यांत नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील मराठा समाजाच्या नागरिकांना आपापल्या समस्या मांडण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र, नोंदींची पडताळणी आणि कास्ट व्हॅलिडिटीसंदर्भात अडचणी असलेल्या मराठा बांधवांनी दौर्‍यादरम्यान प्रत्यक्ष भेटून आपली बाजू मांडावी. जिल्ह्यामध्ये जे ठिकाण दिले असेल त्याठिकाणी मराठा बांधवांनी यावे, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.

Back to top button