ड्रिंक अँड ड्राईव्ह अपघातात दोघांचा मृत्यू
राजारामपुरी पोलिसांकडून दोघांना अटक

कोल्हापूर /23 नोव्हेंबर : कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ ते शाहू टोल नाका रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास मद्यधु ंद अवस्थेत बेभान वेगाने कार चालवून दोन दुचाकीस्वारांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात दोन सख्ख्या चुलत भावांचा अतिरक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झाला असून, पाथरूट कुटुंबाचा मुख्य आधारच गमावल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. याप्रकरणी ’गोकुळ’चे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांचा मुलगा पद्मसिंह पाटील याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे 11:45 वाजण्याच्या सुमारास सायबर चौक परिसरातील पाथरूट गल्लीत राहणारे उमेश विलास पाथरूट (वय 32) आणि गणेश सुनील पाथरूट (वय 34) हे सख्खे चुलत भाऊ शिवाजी विद्यापीठ परिसरात जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपून दुचाकीवरून परतत असताना, ताराबाई पार्क येथील निवासी कारचालक पद्मसिंह रणजितसिंह पाटील (वय 36) हा आपली विनफास्ट कंपनीची इलेक्ट्रिक कार घेऊन शाहू टोलनाक्याच्या दिशेने बेभान वेगाने जात होता. मद्यधु ंद अवस्थेत असलेल्या पद्मसिंहच्या भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही तरुण सुमारे 15 फूट हवेत फेकले गेले. अपघातानंतर संशयित चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच अतिरक्तस्त्रावामुळे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.





