मेळघाटातील जंगलाच्या सुरक्षेचा केंद्रीय समितीकडून आढावा
मेळघाटच्या जंगलाचा केंद्राकडून आढावा

दुर्गम भागात पोहोचली समिती, आदिवासी समाजाशी साधला संवाद
जलविद्युत प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध
वनसंवर्धनासोबत रोजगाराच्या संधी वाढवण्याची मागणी
अमरावती/23 नोव्हेंबर – मेळघाटातील वाघांचे संरक्षण, वन्यजीवांचा अधिवास, जंगलाची सद्यस्थिती आणि स्थानिक आदिवासी बांधवांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी केंद्राची व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन समिती मेळघाटात दाखल झाली आहे. दोन दिवसांपासून समितीचे सदस्य जंगलाच्या अत्यंत दुर्गम भागात जाऊन कामाची पाहणी करत असून स्थानिकांशी थेट संवाद साधत आहेत. या दौर्यात गावांच्या पुनर्वसनाची भीती, रोजगाराची गरज आणि प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पाला स्थानिक तरुणांनी केलेला कडाडून विरोध हे मुद्दे प्रामुख्याने समोर आले आहेत.
केंद्राच्या या 3 सदस्यीय समितीचे अध्यक्ष राजीव श्रीवास्तव असून त्यांच्यासोबत अजय नाईक, समीर कुमार सिन्हा हे सदस्य आहेत. या संपूर्ण दौर्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक चंद्रशेखरन बाला आणि गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा येथील उपवनसंरक्षक यशवंत बहाळे हे अधिकारी समितीला माहिती देत आहेत. समितीने कोलकास, सेमाडोह, निमना कॅम्प, आमझरी, चिखलदरा, वैराट, कोकटू यांसह अनेक दुर्गम भागांत भेटी देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली. कोलकास आणि सेमाडोह येथील पर्यटन संकुलांना भेट देऊन समितीने स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. सेमाडोह येथील आदिवासी तरुणांनी गावातच रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी केली. आमच्या गावांचे पुनर्वसन करू नका आणि जंगल व गाव यांचे पारंपरिक नाते कायम ठेवून आम्हाला विकासात सामावून घ्या, अशी साद या तरुणांनी समितीला घातली. सेमाडोह ते चिखलदरा मार्गावरील मेमना कॅम्प, गालाफाटा संरक्षण कॅम्प यांसह खटकाली येथील प्रकाश निवासाला समितीने भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यक्रमात या निवासाचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता. येथून स्थानिकांना मिळणार्या संधींबाबत समितीने मार्गदर्शन केले. चिखलदरा येथील निसर्ग माहिती केंद्राची पाहणी करून येथील माहितीचे अधिक संगणकीकरण करण्याचा सल्ला समितीने दिला. या केंद्रात वन्यप्राणी आणि पक्षांचे आवाज ऐकण्याची सोय असून वृक्ष, फुलपाखरे, कीटक, फुले आणि आदिवासी बांधवांच्या सण-उत्सवांची माहिती ठेवली आहे. याशिवाय वाघांच्या सुरक्षित अधिवासासाठी महत्त्वाच्या असलेल्या वैराटच्या गवताळ जंगलाची आणि अत्यंत घनदाट अशा कोकटू परिसराची समितीने पाहणी केली. सध्या समितीचा मुक्काम धारगड येथे असून धारगड परिसरातील तृणभक्षक प्राण्यांचे खाद्य आणि वाघांच्या सुरक्षिततेचा आढावा घेतला जाणार आहे. या दौर्याबाबत समितीचे अध्यक्ष राजीव श्रीवास्तव यांनी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असून आम्ही सविस्तर माहिती घेत आहोत, मात्र माध्यमांशी अधिक बोलता येणार नाही अशी सावध भूमिका मांडली.
महिला बचत गटांच्या कामाचे कौतुक -आमझरी पर्यटन संकुलात समितीने आदिवासींना मिळणार्या रोजगाराचा आढावा घेतला. शहापूर येथील स्फूर्ती समूहाच्या माध्यमातून महिला बचत गटांचे मोठे काम सुरू आहे. जंगलातील हिरडा, आवळा गोळा करून त्यापासून विविध पदार्थ, पावडर आणि लोणची तयार केली जातात. तसेच मध गोळा करण्याच्या कामातून महिलांना चांगला रोजगार मिळत आहे. जंगलाचे नुकसान न करता स्थानिक महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या या उपक्रमाचे समितीने कौतुक केले. तसेच भीमकुंड परिसरात दोन डोंगरांच्या मधोमध सुरू असलेल्या दोरमार्ग, सायकल चालवणे आणि भव्य झोक्याच्या प्रकल्पाची प्रशंसा करत नवीन उपक्रम राबवण्याच्या सूचना केल्या.





