पुरामुळे खचलेल्या पुलाचे काम चार महिन्यांपासून रखडले
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास सुरूच

अंजनगाव बारी/20 नोव्हेंबर : वडगाव (जिरे) येथील रायघोळ नदीवरील वडगाव (जिरे)-मालखेड मार्गावरील पूल अतिवृष्टीमुळे खचून मोठे नुकसान झाले आहे. मात्र, या घटनेला चार महिने उलटूनही पुलाच्या दुरुस्तीचे काम अद्याप मार्गी लागलेले नाही. संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना आजही धोकादायक परिस्थितीतून ये-जा करावी लागत असून जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ आली आहे.
या पुलावरून वडगाव (जिरे), मालखेड तसेच अंजनगाव बारी परिसरातील नागरिकांची नियमित वाहतूक होते. परिसरातील सुमारे 150 शेतकर्यांची शेती याच मार्गावर असल्याने शेतमालाची वाहतूक, शेतमजुरांची ये-जा तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासावर गंभीर परिणाम झाला आहे. स्मशानभूमीकडे जाणाराही हाच मार्ग असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, दरवर्षी पावसाळ्यात या पुलाची समस्या निर्माण होत असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. चार महिन्यांपासून दुरुस्तीचे काम रखडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.संबंधित विभागाने व स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून पुलाची दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी मजबूत व कायमस्वरूपी पुलाचे बांधकाम करावे, अशी जोरदार मागणी प्रशासक सरपंच धनश्याम ब्राह्मणे यांच्यासह परिसरातील नागरिकांकडून होत आहे.





