अंजनगाव-परतवाडा मार्गावर भीषण अपघातात युवक ठार

भरधाव पल्सरची डिव्हायडरला जोरदार धडक

पॉवर स्टेशनजवळील घटना

अंजनगाव सुर्जी। 19 नोव्हेंबर: अंजनगाव-परतवाडा मार्गावर भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात 26 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास घडली, ऋतिक संतोषराव मुरतकर (वय 26,रा.पांढरी)असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऋतिक मुरतकर हा बजाज कंपनीच्या पल्सर दुचाकीने परतवाडा मार्गावरून भरधाव वेगाने अंजनगाव सुर्जीच्या दिशेने येत होता. दरम्यान, परत वाडा रोडवरील पॉवर स्टेशन जवळ अचानक दुचाकी वरील त्याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव दुचाकी थेट रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरवर जाऊन जोरात आदळली.धडक इतकी भीषण होती की,दुचाकीचालक ऋतिक हा डिव्हायडरच्या दुसर्‍या बाजूला फेकला गेला.या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही केली.मृतदेह शवविच्छेदनासाठी अंजनगाव सुर्जी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.तेथे शवविच्छेदन करण्यात आले.भरधाव वेगामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटून हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती असून,या घटनेने अंजनगाव-परतवाडा मार्गावरील सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.एका तरुणाचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने पांढरी परिसरात शोककळा पसरली आहे.सदर अपघात येथील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

Back to top button