कापुसतळणी-कसबेगव्हाण रस्ता झाला मृत्यूचा सापळा

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला

खड्डे, उखडलेले डांबरीकरण अन् धोकादायक प्रवास

मोठ्या अपघाताची प्रतीक्षा कशासाठी?

अंजनगाव सुर्जी/19 नोव्हेंबर : तालुक्यातील कापुसतळणी ते कसबेगव्हाण या मार्गाची दयनीय अवस्था वाहनधारकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असून, या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे झाले आहे. रस्त्याची झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि उखडलेले डांबरीकरण यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे या मार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कापुसतळणी आणि कसबेगव्हाण या गावांना जोडणारा हा रस्ता ग्रामीण भागातील नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, दुचाकीस्वार तसेच इतर वाहनधारकांना दररोज याच मार्गावरून ये-जा करावी लागते. मात्र, रस्त्याची अवस्था पाहता प्रवासादरम्यान वाहनावरील नियंत्रण सुटण्याची भीती कायम असते. विशेषतः दुचाकीस्वारांना खड्डे चुकविताना मोठी कसरत करावी लागत असून, रात्रीच्या वेळी हा धोका अधिकच वाढतो. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनांचे नुकसान होत असून प्रवासाचा वेळही वाढत आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या देखभालीसाठी शासनाकडून निधी आणि विविध योजना राबविल्या जात असताना प्रत्यक्षात या मार्गाची झालेली अवस्था संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. संबंधित बांधकाम विभागाने या रस्त्याची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता दर्जेदार आणि टिकाऊ काम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.अपघातानंतर पंचनामे आणि आश्वासनांची औपचारिकता करण्यापेक्षा दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने जागे होणे गरजेचे आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबवून कापुसतळणी- कसबेगव्हाण रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

Back to top button