बँक लिलावात घर देण्याच्या नावाखाली 18.95 लाखांची फसवणूक

बँक चलन आणि कागदपत्रांच्या बहाण्याने टप्प्याटप्प्याने पैसे उकळले, घराचे वैध दस्तऐवज न देता तिघांनी केली फसवणूक

अमरावती /19 नोव्हेंबर- बँकेच्या लिलावातून कमी किमतीत घर मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची तब्बल 18 लाख 95 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार शहरातील तसरा कॉलनी परिसरात उघडकीस आला आहे. बँकेचे चलन भरणे आणि लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करून देण्याच्या नावाखाली आरोपींनी तक्रारदाराकडून वेगवेगळ्या वेळी लाखो रुपये घेतले. मात्र, संपूर्ण रक्कम मिळाल्यानंतरही घराशी संबंधित बँकेचे वैध दस्तऐवज दिले नाहीत. तसेच घर खरेदीची प्रक्रियाही पूर्ण केली नाही. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी यवतमाळ येथील दोघांसह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
हजरत बिलाल नगर येथील रहिवासी अशफाक बाबू (45) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीनुसार, आरोपींनी त्यांना बँकेच्या लिलाव प्रक्रियेतून घर खरेदी करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी बँकेचे चलन भरणे आणि लिलावाशी संबंधित आवश्यक कागदपत्रे तयार करण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने पैसे घेतले. आरोपींवर विश्वास ठेवून अशफाक बाबू यांनी एकूण 18 लाख 95 हजार रुपये दिले. मात्र, पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी घराच्या मालकीसंबंधी कोणतेही वैध कागदपत्र दिले नाही. वारंवार विचारणा करूनही केवळ आश्वासने मिळत होती. प्रत्यक्षात घर खरेदीची प्रक्रिया पुढे जात नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे यवतमाळ येथील गौतम सुनीलकुमारजी कोठारी (40), महाकवर राजेश कोठारी (35) आणि अन्य एका व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. बँकेच्या लिलावातून स्वस्तात घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी अशा व्यवहारांत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कोणालाही पैसे देण्यापूर्वी संबंधित बँकेकडून लिलावाची खातरजमा करावी, मालमत्तेची मालकी आणि सर्व वैध कागदपत्रांची तपासणी करावी, असे आवाहन या घटनेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरते.

Back to top button