चीनमध्ये मानव जाधवची सुवर्णभरारी
720 पैकी 711 गुणांची कमाई करत 43 स्पर्धकांवर मात

आशिया चषक पात्रता फेरीत अव्वल स्थान पटकावले
अमरावती/18 नोव्हेंबर – चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या आशिया चषक जागतिक क्रमवारीच्या तिसर्या टप्प्यातील पात्रता फेरीत अमरावतीचा युवा तिरंदाज मानव जाधव याने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. अवघ्या 18 व्या वर्षी त्याने 720 पैकी तब्बल 711 गुण मिळवत 43 तिरंदाजांना मागे टाकून पहिले स्थान पटकावले. विशेष म्हणजे 30 वेळा 10 गुणांचे अचूक लक्ष्य भेदत त्याने आपल्या कौशल्याची छाप पाडली. त्याच्या या यशामुळे भारतीय संघालाही सांघिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळाले आहे.
मानवने या स्पर्धेत सुरुवातीपासूनच अचूक नेमबाजी आणि एकाग्रतेच्या जोरावर आघाडी कायम ठेवली. भारतीय संघातील गणेश मणिरत्नम थिरुमुरू याने 707 गुणांसह सहावे स्थान मिळवले. मोहित भाटीने 703 गुणांसह 14 वे, तर सचिन चेची याने 702 गुणांसह 16 वे स्थान पटकावले. या सर्वांच्या कामगिरीमुळे भारताला सांघिक क्रमवारीत दुसरे स्थान मिळाले. मानवने यापूर्वीही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. मागील वर्षी बँकॉक येथे झालेल्या आशिया चषकाच्या पहिल्या टप्प्यात त्याने 2160 पैकी 2129 गुण मिळवत विक्रम केला होता. या स्पर्धेत त्याने सुवर्णपदकही जिंकले होते. 2022 मध्ये शारजाह येथे झालेल्या कनिष्ठ आशिया चषकातून त्याने आंतर राष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. तेथेही सुवर्णपदक मिळवून त्याने लक्ष वेधले होते. यानंतर आयर्लंडमधील लिमरिक येथे झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत त्याने रौप्य आणि कांस्यपदक पटकावले. दक्षिण कोरियातील सुवोन येथे झालेल्या आशिया चषकाच्या तिसर्या टप्प्यातही त्याने एक रौप्य आणि एक कांस्यपदक मिळवले. तसेच चिनी तैपेई येथे झालेल्या आशियाई युवा तिरंदाजी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. मानव हा अमरावतीचे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांचा मुलगा आहे. कमी वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने यश मिळवणार्या मानवच्या कामगिरीमुळे अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे.





