देवेंद्र चैतन्य महाराजांच्या मृत्यूमागे मोठे षडयंत्र

ग्रामस्थांची पोलिसांकडे सखोल चौकशीची मागणी

जालना /18 नोव्हेंबर: भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथील पाताळेश्वर महादेव मंदिराजवळील खोलीत हभप देवेंद्र चैतन्य स्वामी यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याच्या घटनेनंतर आता संपूर्ण गाव आक्रमक झाले आहे. महाराजांच्या मृत्यूमागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी अवघडराव सावंगी येथील सर्वधर्मीय नागरिक एकवटले असून बुधवारी (दि. 18 नोव्हेंबर) पारध पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. ग्रामपंचायत पदाधि कार्‍यांसह तब्बल 150 ते 200 ग्रामस्थ यावेळी पोलीस ठाण्यात उपस्थित होते. रविवार, 15 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पाताळेश्वर महादेव मंदिराजवळील खोलीत देवेंद्र चैतन्य स्वामी यांचा मृतदेह आढळून आला होता. महाराजांचा सर्वच जाती-धर्माच्या नागरिकांमध्ये मोठा आदर आणि स्नेह होता. त्यामुळे महाराज स्वतःहून गळफास घेण्यासारखे टोकाचे पाऊल उचलूच शकत नाहीत, असा गावकर्‍यांचा ठाम विश्वास आहे.

Back to top button