अवघ्या पाच तासांत शाळेतील चोरीचा छडा
70 हजारांचा मुद्देमाल पोलिसांकडून तात्काळ जप्त

दोन अल्पवयीन मुलांचा चोरीमध्ये सहभाग उघड
अमरावती /17 नोव्हेंबर- बडनेरा येथील महानगरपालिका शाळा क्रमांक 24 मधून चोरी गेलेला 68 इंची डिजिटल दूरचित्रवाणी संच आणि ध्वनिवर्धक असा सुमारे 70 हजार रुपयांचा मुद्देमाल बडनेरा पोलिसांनी अवघ्या पाच तासांत जप्त केला असून या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग उघडकीस आला आहे.
अमरावती येथील गजानन धाम, रेवसा मार्ग येथे राहणारे गौरव विश्वासराव मेश्राम (वय 39) हे पवननगर, नवीवस्ती बडनेरा येथील महापालिका शाळा क्रमांक 24 मध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 15 नोव्हेंबर सायंकाळी 6 ते 16 नोव्हेंबर सकाळी 10 या वेळेत अज्ञात चोरट्यांनी चौथ्या वर्गाच्या खोलीतून 68 इंची डिजिटल दूरचित्रवाणी संच, विद्युत पुरवठा यंत्र आणि ध्वनिवर्धक असा 70 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.
मेश्राम यांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 305(ई), 331(3) आणि 331(4) नुसार गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान गुप्त बातमीदाराकडून हा मुद्देमाल इंदिरानगर, नवीवस्ती बडनेरा परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता दोन अल्पवयीन मुलांनी संगनमताने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून सर्व चोरीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन जप्त केला आहे.





