धारणी तहसीलदारांवर खोटे आरोप करणार्‍या पितापुत्रांवर गुन्हा

आढावा बैठकीत लाच मागितल्याचा आरोप

तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

धारणी/17 नोव्हेंबर – आ. रवी राणा यांच्या तालुकास्तरीय आढावा बैठकीत तहसीलदार आणि महसूल कर्मचार्‍यांवर लाच मागितल्याचा खोटा आरोप करणार्‍या पितापुत्रांविरुद्ध धारणी पोलिसांनी मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रशासनावर दबाव आणून शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी पोलिसांत लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीवरून गुन्नूलाल मालविय आणि राजेश गुन्नूलाल मालविय (दोघेही रा. धारणी) यांच्यावर कारवाई करण्यात आली असून तालुक्यात खळबळ उडाली आहे. धारणी येथील गुन्नूलाल मालविय यांची मौजा टिंग्या येथे शेतजमीन आहे. या जमिनीचा वर्गबदल करण्यासाठी त्यांनी महसूल विभागाकडे अर्ज दिला होता. तत्कालीन तहसीलदारांनी कायदेशीर प्रक्रिया आणि कागदपत्रांची तपासणी करून त्यांचा हा अर्ज नामंजूर केला होता. नियमाप्रमाणे या निर्णयाविरुद्ध वरिष्ठ अधिकार्‍यांकडे अपील करणे गरजेचे होते. मात्र, ही जुनी माहिती लपवून मालविय यांनी पुन्हा त्याच विषयावर नव्याने अर्ज दाखल केला.
दरम्यान, आ. रवी राणा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत या पितापुत्रांनी भर सभेत गोंधळ घातला. तहसीलदार आणि महसूल सहाय्यक यांनी शेतजमिनीच्या वर्गबदलासाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप त्यांनी भर बैठकीत केला. हे सर्व आरोप बिनबुडाचे आणि पुराव्याशिवाय असल्याचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकारामुळे बैठकीत उपस्थित असलेले अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांसमोर महसूल विभागाची तसेच स्वतःची मोठी बदनामी झाली. तसेच लोकप्रतिनिधींचीही दिशाभूल करण्यात आली, असे शेवाळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेची दखल घेत तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी तातडीने धारणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी 15 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गुन्नूलाल मालविय आणि राजेश गुन्नूलाल मालविय या दोघांवर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. प्रशासनावर खोटे आरोप करून दबाव आणण्याचे राजकारण केले जाते का, अशी चर्चा आता सुरू झाली असून पोलिसांच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button