चार महिन्यांपासून दिव्यांग, निराधारांचे मानधन रखडले
शासकीय मदतीची प्रतीक्षा; उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर

अंजनगाव सुर्जी /18 नोव्हेंबर: शासनाच्या सामाजिक न्यायाच्या योजना कागदावर प्रभावी दिसत असल्या, तरी प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यात वेळेवर आर्थिक मदत पोहोचत नसल्याचे चित्र समोर येत आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दिव्यांग तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अनेक लाभार्थ्यांना गेल्या चार महिन्यांपासून मानधनाची रक्कम मिळाली नसल्याचे काही लाभार्थ्यांकडुन सांगण्यात येत आहे. त्यामुळे आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या या घटकांसमोर आता दैनंदिन उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
दिव्यांग व्यक्ती, निराधार महिला, वृद्ध तसेच समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य दिले जाते. अनेक लाभार्थ्यांच्या जीवनाचा हा एकमेव आर्थिक आधार आहे. औषधोपचार, किराणा, घरखर्च आणि दैनंदिन गरजा भागविण्यासाठी या मानधनावर अवलंबून असणार्या लाभार्थ्यांना सलग चार महिने आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागत असल्याची बाब चिंताजनक आहे.
एकीकडे शासन विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आर्थिक आधार देण्याचा दावा करते, तर दुसरीकडे पात्र लाभार्थ्यांना मंजूर आर्थिक सहाय्य वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. मानधन रखडण्यामागील नेमके कारण काय? निधी उपलब्ध नाही की प्रशासकीय स्तरावर तांत्रिक अडचणी आहेत? पात्र लाभार्थ्यांचे बँक खाते, आधार संलग्नता अथवा ई-केवायसीसंदर्भातील काही समस्या आहेत का? याबाबत लाभार्थ्यांना स्पष्ट माहिती मिळणे आवश्यक आहे. या प्रकरणी तहसील प्रशासन आणि संबंधित सामाजिक न्याय विभागाने तातडीने लक्ष घालून मानधन वितरणातील अडचणींची वस्तुस्थिती स्पष्ट करावी. मागील चार महिन्यांचे प्रलंबित मानधन पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात त्वरित जमा करावे. तसेच मानधन वितरणात नेमका विलंब का होत आहे, याची माहिती सार्वजनिक करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





