मेळघाटच्या सागवानावर तस्करांचा डल्ला
जारिदा वनपरिक्षेत्रात मोठे रॅकेट सक्रिय?

दोन कारवाई तस्कर जेरबंद
मोटारसायकली जप्त
चिखलदरा/18 नोव्हेंबर : मेळघाटच्या घनदाट जंगलातील मौल्यवान सागवान वृक्षांवर तस्करांनी डोळा ठेवला असून, जारिदा वनपरिक्षेत्रात अवैध सागवान तस्करीचे जाळे सक्रिय असल्याची गंभीर चर्चा परिसरात सुरू आहे. महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेलगतच्या जंगलातून सागवानाची अवैध तोड करून परराज्यात वाहतूक केली जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, मागील आठवड्यात वनविभागाने केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये तस्करांना पकडण्यात आले. मात्र, या कारवायांनंतरही सीमावर्ती भागातील संशयास्पद हालचाली थांबलेल्या नसल्याची चर्चा असल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दोन कारवाया, आरोपींची धरपकड आणि वाहनांची जप्ती होऊनही या तस्करीमागील मुख्य सूत्रधार कोण, त्यांना लाकडाची वाहतूक करण्यासाठी मदत कोण करीत आहे आणि जंगलातील अवैध तोडीवर प्रभावी नियंत्रण का मिळत नाही, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ वनाधिकार्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि वनप्रेमींकडून होत आहे.
मेळघाटातील सागवान हे उच्च प्रतीचे आणि बाजारमूल्याच्या दृष्टीने महत्त्वाचे लाकूड मानले जाते. याच आर्थिक आकर्षणातून जंगलातील मौल्यवान वृक्षांची अवैध तोड होत असल्याचा संशय आहे. जारिदा वनपरिक्षेत्राला मध्य प्रदेशची सीमा लागून असल्याने या संवेदनशील पट्ट्यात विशेष दक्षता आणि प्रभावी गस्त आवश्यक आहे.
मात्र, रात्रीच्या सुमारास जंगल परिसरात संशयास्पद हालचाली होत असल्याच्या चर्चेमुळे वनविभागाच्या देखरेखीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. सीमावर्ती भागातील जंगलातून सागवान बाहेर नेले जात असल्याचा संशय असल्यास त्यामागील संपूर्ण वाहतूक साखळीचा तपास होणे गरजेचे आहे. केवळ लाकूड वाहून नेणार्यांवर कारवाई करून चालणार नाही, तरन अवैध तोड करणारे, लाकूड खरेदी करणारे आणि वाहतुकीला आर्थिक पाठबळ देणारे संभाव्य सूत्रधारही तपासाच्या कक्षेत आणणे आवश्यक आहे.
दोन कारवाही झाल्या, मग तस्करीला आळा का नाही?
मागील आठवड्यात वनविभागाने दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये कारवाई करून आरोपींना पकडल्याने तस्करीचे प्रकार समोर आले आहेत. या कारवायांमध्ये संबंधित आरोपींच्या मोटारसायकलीही जप्त करण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.
तथापि, या कारवायांमुळे तस्करीचे मूळ जाळे उद्ध्वस्त झाले आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पकडण्यात आलेले आरोपी केवळ वाहतुकीत सहभागी होते की त्यांचा मोठ्या रॅकेटशी संबंध आहे, याचा तपास होणे आवश्यक आहे. जप्त वाहनांच्या आधारे आरोपींचे संपर्क, वाहतुकीचे मार्ग आणि संभाव्य आर्थिक व्यवहार यांचा तपास केल्यास या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे समोर येऊ शकतात.
वनगस्त केवळ कागदावरच आहे का?
जंगलातील अवैध वृक्षतोड रोखण्यासाठी नियमित रात्रगस्त, सीमावर्ती नाकाबंदी, संवेदनशील मार्गांवर देखरेख आणि संशयास्पद हालचालींवर तातडीने कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, जारिदा वनपरिक्षेत्रातील तस्करीच्या घटनांमुळे या उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत प्रभावी आहे, याची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
स्थानिक पातळीवर काही वनकर्मचार्यांच्या कार्यपद्धतीबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, कोणत्याही अधिकार्याचा तस्करीशी संबंध असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. त्यामुळे या प्रकरणात संबंधित अधिकारी व कर्मचार्यांच्या कामकाजाची वरिष्ठ पातळीवरून स्वतंत्र चौकशी होणे महत्त्वाचे ठरणार आहे. गस्तीच्या नोंदी, तपासणी अहवाल, नाकाबंदीची माहिती आणि कारवाईचे रेकॉर्ड तपासल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते.
वनसंपत्तीच्या रक्षणाची जबाबदारी कोणाची?
मेळघाटचे जंगल ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून स्थानिक आदिवासी समाजाच्या जीवनाचा आधार आहे. जंगलातील वृक्षसंपदा, जैवविविधता आणि पर्यावरणीय संतुलन टिकवून ठेवणे ही वनविभागाची महत्त्वाची जबाबदारी आहे. सागवानाची अवैध तोड आणि तस्करी रोखण्यात अपयश आले, तर त्याचे गंभीर पर्यावरणीय परिणाम होऊ शकतात.त्यामुळे जारिदा वनपरिक्षेत्रातील सीमावर्ती जंगलाची वरिष्ठ अधिकार्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी, तस्करीच्या घटनांची सखोल चौकशी करावी, संबंधित अधिकारी-कर्मचार्यांच्या कामकाजाचे परीक्षण करावे आणि या प्रकरणामागील संपूर्ण साखळी उघड करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ठऋज यांचे म्हणणे : सीमाभागात गस्त वाढवली, दोषींवर कठोर कारवाई करणार!
या प्रकरणाबाबत जारिदा वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी भरत कोडी यांनी सांगितले की, जारिदा वनपरिक्षेत्र मध्य प्रदेशच्या सीमेलगत असल्याने तपास वेगाने सुरू आहे. संबंधित प्रकरणातील आरोपींचा शोध घेतला जात असून घटनास्थळावरून त्यांच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त वाहनांच्या आधारे सखोल चौकशी सुरू आहे. सीमाभागात गस्त वाढविण्यात आली असून आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर वन कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल.
वरिष्ठ वनाधिकार्यांच्या चौकशीकडे लक्ष!
दोन कारवायांनंतरही तस्करीच्या संशयास्पद हालचालींची चर्चा कायम असल्याने आता वनविभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी या प्रकरणात लक्ष घालणे आवश्यक झाले आहे. जप्त वाहनांच्या तपासातून मुख्य सूत्रधारांपर्यंत यंत्रणा पोहोचणार का? सीमावर्ती जंगलातील अवैध वृक्षतोडीला कायमस्वरूपी आळा बसणार का? तसेच स्थानिक यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे मिळणार का? याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.





