रामायण चित्रपटातील बदलांवर हिंदू संघटनांचा आक्षेप

रावणाचे उदात्तीकरण केल्याचा आरोप

मूळ रामायणातील प्रसंगांशी छेडछाड केल्याचा दावा

अमरावती/18 नोव्हेंबर – नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रामायण’ चित्रपटातील काही प्रसंगांवरून हिंदू संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महर्षी वाल्मिकी यांच्या मूळ रामायणातील कथेत बदल करून रावणाचे अनावश्यक उदात्तीकरण करण्यात आले असून प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांच्या पराक्रमाचे महत्त्व कमी दाखविण्यात आल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे. चित्रपटात लक्ष्मणाचे अवमूल्यन, मूळ प्रसंगांचा विपर्यास आणि धार्मिक संदर्भांमध्ये बदल करण्यात आल्याचा दावा करत समितीने आगामी दुसर्‍या भागाला कडाडून विरोध करण्याचा इशारा दिला आहे. या चित्रपटातून साम्यवादी विचारांचा प्रसार होत असल्याचा आरोपही संघटनेने केला असून दुसरा भाग प्रदर्शित करण्यापूर्वी हिंदू संत आणि रामायणाच्या अभ्यासकांना तो दाखविण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते अभय वर्तक आणि हिंदू जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ते सतीश कोचरेकर उपस्थित होते.सुनील घनवट म्हणाले की, रामायण हा कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे या कथेशी संबंधित चित्रपट तयार करताना मूळ ग्रंथातील घटनांचा आदर राखणे आवश्यक आहे. मात्र, चित्रपटात अनेक ठिकाणी मूळ कथेत बदल करून रावणाला मोठे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशा प्रकारचे चित्रण हिंदू समाज सहन करणार नाही. दुसर्‍या भागातही असे बदल दिसल्यास देशभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. अभय वर्तक यांनीही चित्रपटातील बदलांवर आक्षेप घेतला. धार्मिक ग्रंथांवर आधारित चित्रपटांना प्रमाणपत्र देताना परिक्षण मंडळाने संबंधित ग्रंथांचा सखोल अभ्यास करावा. इतर धर्मांच्या भावना जपल्या जातात, मात्र हिंदूंच्या धार्मिक भावनांकडे दुर्लक्ष केले जाते, अशी टीकाही त्यांनी केली. दुसर्‍या भागाच्या प्रदर्शनापूर्वी निर्माते आणि दिग्दर्शकांनी चित्रपट हिंदू संत तसेच रामायणाच्या जाणकारांना दाखवावा. केंद्र सरकारनेही या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी संघटनेने केली.

Back to top button