माता अन् बाळांच्या जीवाची घेणार काळजी
मेळघाटात डिजिटल पध्दतीने मिशन 28 उपक्रम

सीईओ सत्यम गांधींच्या पुढाकाराने जिल्हाभर मोहीम
अमरावती/15 नोव्हेंबर – मेळघाट भागातील माता व बालमृत्यूचा कलंक पुसण्यासाठी जिल्हा परिषदेने आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या पुढाकाराने मिशन 28 हा खास उपक्रम आता डिजिटल स्वरूपात राबवला जात आहे. यामुळे गरोदरपणाचे 28 दिवस आणि बाळंतपणानंतरचे 28 दिवस अशा एकूण 56 दिवसांत माता व बाळाची थेट काळजी घेतली जाणार आहे.
मेळघाटातील दुर्गम भागात कागदी नोंदी आणि वरवरच्या भेटींऐवजी आता प्रत्येक कामाची संगणकीय नोंद ठेवली जाणार आहे. या खास मोहिमेचा प्रायोगिक तत्त्वावरचा वापर साद्राबाडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सुरू देखील झाला आहे.
नवीन व्यवस्थेनुसार बाळाचा जन्म झाल्यापासून अवघ्या 24 तासांत आरोग्य सेवकाला बाळाची ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. ही नोंदणी होताच संबंधित गावातील आशा ताई आणि अंगणवाडी सेविकांना याची तात्काळ माहिती मिळेल. त्यानंतर बाळाची पहिली गृहभेट त्याच दिवशी निश्चित केली जाणार आहे. बाळंतपण, जन्म तसेच आई आणि बाळाच्या तब्येतीची सर्व माहिती संगणकीय पत्रात भरली जाईल. यामुळे माहिती इकडे तिकडे अडकण्याची किंवा वेळेवर न पोहोचण्याची भीती पूर्णपणे संपणार आहे. या मोहिमेअंतर्गत आशा ताई आणि अंगणवाडी सेविका एक दिवसाआड माता व बाळाच्या घरी जाऊन तपासणी करतील. प्रत्येक भेटीचा तपशील जागेवरच संगणकीय पत्रात भरणे आवश्यक असल्याने नंतर अंदाजे अहवाल तयार करण्याला आळा बसेल. नियमित भेटींमुळे आई आणि बाळाच्या तब्येतीतील कोणताही बदल वेळेत लक्षात येईल.
कर्मचारी खरोखर घरी पोहोचले की नाही याची खात्री करण्यासाठी ठिकाणाची नोंद असलेले छायाचित्र संगणकीय प्रणालीवर टाकणे अनिवार्य केले आहे. या छायाचित्रामुळे ठिकाण आणि वेळेचा पक्का पुरावा मिळणार असल्याने प्रत्यक्ष जमिनीवर होणार्या कामाचा अचूक अंदाज घेता येणार आहे. एका क्लिकवर संपूर्ण गावाचा खरा लेखाजोखा-आशा ताई, आरोग्य सेवक आणि अंगणवाडी सेविकांच्या कामासाठी स्वतंत्र संगणकीय फलक तयार केले जात आहेत.
यामुळे अधिकार्यांना एकाच जागी कोणत्या गावात किती गृहभेटी झाल्या आणि कुठे आरोग्याची अडचण आली हे लगेच कळेल. आई किंवा बाळाच्या जीवाला धोका दिसताच संबंधित अधिकार्याला थेट माहिती मिळून तात्काळ मदत करणे शक्य होईल.





