आज मोर्शीत अर्ध दफन आंदोलन
प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनाचा (उबाठा) पुढाकार

मजीप्रा योजनेसाठी बंडू साऊथच्या नेतृत्वात एल्गार
बस स्थानक परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात
मोर्शी /15 नोव्हेंबर- मोर्शी तालुक्यातील 23 गावांसाठी मंजूर झालेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा योजना तातडीने लागू करावी आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधावे यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता येथील बस स्थानकासमोर अर्ध दफन आंदोलन करण्यात येणार आहे.
तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या आणि 23 गावांतील पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून रखडला आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रकल्पग्रस्त आणि गावकर्यांमध्ये मोठा संताप पसरला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी बंडू साऊथ यांच्या नेतृत्वात हे आक्रमक आंदोलन छेडले जाणार आहे. आज सकाळी 11 वाजता मोर्शी बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जमिनीत गळ्यापर्यंत गाडून घेत कार्यकर्ते अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवतील.
या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उतरणार आहेत. त्यासोबतच युवासेना आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांचाही यात मोठा सहभाग राहणार आहे. हा लढा केवळ एका पक्षाचा नसून सर्वसामान्य जनतेच्या हक्काचा असल्याने परिसरातील नागरिकांनी आणि प्रकल्पग्रस्तांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सामील व्हावे असे जाहीर आवाहन बंडू साऊथ यांनी केले आहे.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची खबरदारी-मोर्शी बस स्थानकासमोर आज होणार्या या दफन आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बस स्थानक परिसरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. संपूर्ण परिसरावर पोलिसांची करडी नजर असून उद्याच्या आंदोलनाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.





