जीवनवाहिनी उड्डाणपुलाची वाहतूक अखेर बंद

125 कोटींच्या नवीन पुलाच्या कामाला गती

टीएनटी इन्फ्रा आणि महारेलची संयुक्त जबाबदारी

अमरावती/15 नोव्हेंबर – शहराचा मध्यवर्ती भाग, रेल्वे स्थानक आणि राज्य परिवहन आगारास जोडणारा महत्त्वाचा उड्डाणपूल अखेर संपूर्ण वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रविवार, 15 नोव्हेंबरपासून टीएनटी इन्फ्रा लिमिटेड आणि महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ (महारेल) यांनी या पुलाचा उर्वरित भागही वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला.
जीर्ण झालेल्या या जुन्या पुलाचे पाडकाम पूर्ण करून तिथे 125 कोटी रुपये खर्चून नवीन उड्डाणपूल उभारण्याचे काम आता वेगाने हाती घेण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राजकमल चौक, जयस्तंभ चौक, जस्तम चौक, रेल्वे स्थानक चौक आणि बेलपुरा परिसरातून ये-जा करणार्‍या नागरिकांना आता पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागणार आहे. हा महत्त्वाचा उड्डाणपूल अत्यंत जीर्ण अवस्थेत पोहोचल्याने प्रशासनाने 24 ऑगस्ट 2025 पासूनच यावरील वाहतूक अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी शासनाने 125 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. आ. सुलभा खोडके, संजय खोडके यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे या निधीला मंजुरी मिळून नव्या पुलाच्या प्रक्रियेला खर्‍या अर्थाने वेग आला. सुरुवातीच्या टप्प्यात रेल्वे हद्दीत येणार्‍या पुलाच्या वरच्या भागाचे पाडकाम नागपूर येथील मत्ते असोसिएट्स या संस्थेकडे सोपवण्यात आले होते. या संस्थेने रेल्वे हद्दीतील संपूर्ण भाग यशस्वीरीत्या जमीनदोस्त केला आहे. आता उरलेला भाग पाडण्याची जबाबदारी टीएनटी इन्फ्रा लिमिटेड आणि महारेल यांनी स्वतःकडे घेतली आहे.आतापर्यंत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पुलाच्या काही भागावरून मर्यादित स्वरूपात वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. यापूर्वीच रेल्वे स्थानक चौकातून राजकमल चौकाकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद केला होता. मात्र बेलपुर्‍याकडून रेल्वे स्थानकाकडे येणार्‍या तसेच राजकमल चौकातून जस्तम चौकाकडे जाणार्‍या वाहनांसाठी पुलाची एक बाजू खुली ठेवली होती. त्यामुळे वाहनचालकांना काही प्रमाणात दिलासा मिळत होता. परंतु रविवार 15 नोव्हेंबरपासून ही तात्पुरती सोयही पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. यापुढे राजकमल चौक, जस्तम चौक, रेल्वे स्थानक चौक आणि बेलपुरा या चारही बाजूंनी पुलावर कोणतीही वाहतूक होणार नसल्याची माहिती टीएनटी इन्फ्रा लिमिटेडच्या अधिकार्‍यांनी अमरावती विभागाला दिली आहे.टीएनटी इन्फ्रा लिमिटेड आणि महारेल यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्या सांगाड्याचे पाडकाम तातडीने सुरू केले जाईल. जुना ढाचा पूर्णपणे हटवल्यानंतर लगेचच नवीन पुलाच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाणार आहे. यासाठी जमिनीची तांत्रिक तपासणी आणि इतर आवश्यक चाचण्या सध्या वेगाने सुरू आहेत. या तांत्रिक बाबी पूर्ण होताच प्रत्यक्ष बांधकामाला मोठी गती मिळणार आहे. दररोज हजारो नागरिक, व्यापारी, नोकरदार आणि प्रवासी या मार्गाचा वापर करत असल्याने त्यांच्यासाठी हा पूल अत्यंत सोयीचा होता. आता चारही बाजूंनी रस्ता बंद झाल्यामुळे शहरातील इतर मुख्य रस्त्यांवर वाहतुकीचा मोठा ताण वाढला आहे. नव्या पुलाचे काम कोणत्याही विलंबाशिवाय वेळेत पूर्ण होऊन लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी, अशी अपेक्षा आता अमरावतीकर व्यक्त करत आहेत.

प्रवाशांची गैरसोय आणि प्रशासनापुढील मोठे आव्हान

शहराच्या मध्यवर्ती भागातील हा उड्डाणपूल बंद झाल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. विशेषतः रेल्वे स्थानक आणि बस स्थानकावर जाणार्‍या प्रवाशांना लांबचा वळसा घालून जावे लागत आहे. पर्यायी मार्गांवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी नियोजन करावे आणि कंत्राटदार संस्थेने नवीन पुलाचे काम रात्रंदिवस सुरू ठेवून निर्धारित वेळेत पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Back to top button