सोनम वांगचुक 60 दिवसांसाठी नजरकैदेत

रॅली -मिरवणुकीत सहभागी होण्यास मनाई

लेहच्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकार्‍यांचे आदेश

नवी दिल्ली/15 नोव्हेंबर : शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणारे सोनम वांगचुक यांना 60 दिवसांसाठी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यांना कोणत्याही रॅली किंवा मिरवणुकीत सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. लेहच्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकार्‍यांनी हा आदेश जारी केला आहे.
लडाख स्वायत्त हिल विकास परिषदेच्या निवडणुकांसाठी 4 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. सोनम वांगचुक आणि इतर स्थानिक नेत्यांनी या निवडणुकांच्या वेळेला विरोध दर्शवला आहे. पोलीस अहवालाच्या आधारे प्रशासनाने हे निर्बंध लादण्याची विनंती केली होती. दंडाधिकार्‍यांनी ’भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’ च्या कलम 163 चा वापर करून वांगचुक यांच्या हालचालींवर निर्बंध घातले आहेत. आदेशात म्हटले आहे की, हा आदेश त्वरित प्रभावाने लागू होईल आणि 60 दिवसांपर्यंत कायम राहील.2019 मध्ये लडाख केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतरची प्रथमच लडाख स्वायत्त हिल विकास परिषदेची निवडणूक होत आहे. सोनम वांगचुक आणि स्थानिक संघटनांचे म्हणणे आहे की, डिसेंबर महिन्यात लडाखमध्ये प्रचंड थंडी असते आणि अनेक लोक विशेषतः विद्यार्थी आणि कामगार काही काळासाठी इतरत्र स्थलांतरित होतात. परिणामी, या काळात निवडणुका घेतल्यास हजारो मतदार मतदानापासून वंचित राहू शकतात.

Back to top button