तुरीच्या शेतात फुलांचाच बहर; शेंगांची प्रतीक्षा
नोव्हेंबर महिन्यातही तूर पिकाला फुलोरा, उत्पादन घटण्याची शेतकर्यांना चिंता

चिंचोली गवळी/12 नोव्हेंबर : शेतीचा वाढता खर्च, मजुरांची टंचाई, खते आणि बियाण्यांचे वाढलेले दर यामुळे शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. अशा परिस्थितीत कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळावे, या उद्देशाने अनेक शेतकरी आंतरपीक म्हणून तुरीची लागवड करण्याऐवजी सरसकट तुरीचे पीक घेताना दिसत आहेत.
यंदाही मोर्शी तालुक्यासह परिसरातील अनेक शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड केली आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा तूर उत्पादक शेतकर्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.साधारणतः जून-जुलै महिन्यात तुरीचा पेरा केला जातो. त्यानंतर तीन ते साडेतीन महिने पिकाची वाढ होऊन झाडांना फांद्या फुटतात. पुढे फुलधारणा सुरू होते. फुलोर्यानंतर साधारणतः वीस दिवसांनी शेंगा तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर शेंगांची वाढ होऊन त्या भरायला लागतात आणि साधारणतः डिसेंबर-जानेवारी महिन्यात तूर काढणीसाठी तयार होते. काही भागांत तुरीची काढणी झाल्यानंतर त्याच शेतात गव्हाचा पेराही केला जातो. मात्र, यंदा परिस्थिती वेगळीच दिसून येत आहे. नोव्हेंबर महिना सुरू झाला असतानाही अनेक शेतांमध्ये तुरीच्या झाडांना शेंगा लागण्याऐवजी फुलोराच मोठ्या प्रमाणात दिसत आहे. तुरीला शेंगा कधी लागणार, त्या भरणार कधी आणि पीक काढणीला येणार कधी, असा प्रश्न शेतकर्यांना सतावत आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आणि पिकांना पोषक वातावरण न मिळाल्याने तूर पिकाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. काही शेतकर्यांच्या मते, यंदा तुरीच्या झाडांवर मोठ्या प्रमाणात फुले दिसत असली तरी प्रत्यक्षात शेंगांचे प्रमाण आणि उत्पादन किती राहील, याबाबत साशंकता आहे. योग्य वेळी अवकाळी पाऊस झाला असता तर पिकाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असता, असेही शेतकरी बोलून दाखवत आहेत. आता फुलांचे शेंगांमध्ये रूपांतर किती प्रमाणात होते आणि त्यातून प्रत्यक्ष उत्पादन किती मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.तूर हे ग्रामीण भागातील शेतकर्यांच्या आहारातील महत्त्वाचे पीक आहे. दिवाळी आणि सणासुदीच्या काळात माहेरी येणार्या मुलींना घरातील तुरीच्या शेंगांची भाजी, तुरीची आमटी, तुरीच्या शेंगांचा भात, वांगे-तूर, गोबी-वांगे अशा विविध पारंपरिक पदार्थांचा आवर्जून आस्वाद दिला जातो. मात्र, यंदा नोव्हेंबर महिन्यातही तुरीला फुलोराच असल्याने ताज्या तुरीच्या शेंगांची भाजी स्वयंपाकघरातून काहीशी गायब झाल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे शेतीचा वाढता खर्च, दुसरीकडे पावसाची अनिश्चितता आणि आता तूर पिकाला उशिराने येणारा फुलोरा, यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत सापडला आहे. तुरीला फुलांचा बहर दिसत असला तरी या बहराचे प्रत्यक्ष उत्पन्नात रूपांतर होणार का, हा प्रश्न सध्या शेतकर्यांसमोर कायम आहे. यंदा खरीप हंगामातील बहुतांश पिके समाधानकारक नसल्याचे चित्र असून, तुरीच्या उत्पादनाकडे शेतकर्यांच्या आशा लागल्या आहेत.





