नागपूरमध्ये लक्ष्मीपूजनाच्या रात्री 42 ठिकाणी अग्नितांडव
शोरुमच्या दुकानातील 30 दुचाकी जळून खाक, 1.75 कोटींचे नुकसान झाले

नागपूर/9 नोव्हेंबर : दिवाळीच्या उत्साहावर फटाक्यांच्या आतषबाजीने विरजण पडले आहे. लक्ष्मीपूजनाच्या रात्री नागपूर शहरात आगीच्या घटनांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. फटाक्यांमुळे लागलेल्या आगीच्या तब्बल 42 घटनांची नोंद नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडे झाली आहे.
या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून, देवनगर परिसरातील दुचाकी शोरूमला लागलेली भीषण आग सर्वाधिक नुकसान करणारी ठरली. या आगीत शोरूममधील 25 ते 30 नव्या कोर्या दुचाकी जळून खाक झाल्या, तर 10 ते 15 जुन्या दुचाकींचेही नुकसान झाले.शोरूमचे संचालक महेश घोडमारे यांच्या माहितीनुसार, या घटनेत जवळपास 1.75 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने शहरातील या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. सावरकरनगरमधील देवनगर चौक आणि मेडिकल चौक परिसरातील साई डायनामिक्स टीव्हीएस दुचाकी शोरूमला लक्ष्मीपूजनाच्या रात्री भीषण आग लागली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, परिसरात फोडण्यात आलेल्या फटाक्यांमधील रॉकेट शोरूमच्या शेडवर पडल्याने आग लागल्याचा अंदाज आहे. सुरुवातीला शेडने पेट घेतला आणि काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. शोरूममध्ये उभ्या असलेल्या नव्या दुचाकींनी पेट घेतल्याने मोठे नुकसान झाले. आगीत स्पेअर पार्ट्स, इंजिन ऑइल आणि इतर साहित्यही जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत शोरूममधील मोठ्या प्रमाणावरील साहित्य जळाले होते.शोरूमचे संचालक महेश घोडमारे यांनी सांगितले की, या आगीत सुमारे 25 ते 30 नवीन दुचाकी पूर्णपणे जळाल्या असून, 10 ते 15 जुन्या गाड्यांचे नुकसान झाले आहे. याशिवाय स्पेअर पार्ट्स आणि ऑइलचा साठाही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे पावणेदोन कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.





