मिठाईची खरेदी करताना विशेष काळजी घ्या
आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन, ग्राहकांना दिला कानमंत्र

मुंबई/5 नोव्हेंबर- आजपासून दिवाळीला सुरुवात झाली असून बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर मिठाई, खवा, मावा आणि इतर खाद्यपदार्थांची विक्री होताना दिसत आहे. दिवाळीच्या काळात मिठाईला मोठी मागणी असल्याने काही विक्रेत्यांकडून भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकले जातात. याचपार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने गेल्या महिन्याभरात कारवाई करत 64 कोटी 45 लाख रुपये किमतीचा अन्नसाठा जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यांनी मिठाईमधील भेसळ ओळखण्यासाठी ग्राहकांना मार्गदर्शनक सूचना दिल्या आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, नागरिकांनी मिठाई किंवा खवा खरेदी करताना आवश्यक तेवढीच खरेदी करावी. दोन ते तीन दिवसांपेक्षा अधिक काळ दुकानात ठेवलेली मिठाई किंवा खवा खरेदी करू नये. शक्यतो नामांकित आणि योग्य लेबल असलेल्या दुकानांमधूनच मिठाई खरेदी करावी. मिठाई किंवा खव्याच्या पाकिटावर उत्पादनाची तारीख नमूद आहे का? याची खात्री करावी. मिठाईमध्ये भेसळ असल्याचा संशय आल्यास किंवा काही तक्रार असल्यास नागरिकांनी एफडीए प्रशासनाला कळवावे. जेणेकरून संबंधित तक्रारीवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आवाहन मुंढेंनी केले आहे.
मिठाईमधील भेसळ कशी ओळखाल?
तुकाराम मुंढे म्हणाले की, मिठाईमधील भेसळ ओळखण्या साठी मिठाई खरेदी करताना तिच्या रंगाकडे विशेष लक्ष द्यावे. जर अतिशय भडक रंग किंवा जास्त प्रमाणात कृत्रिम रंग वापरलेली मिठाई असेल तर ती खरेदी करणे टाळावे. तसेच सोन्या-चांदीचा वर्ख लावलेल्या मिठाई खरेदी करतानाही सावधगिरी बाळगावी. चांदीचा वर्ख तपासताना तो हातात घेतल्यावर विरघळतो किंवा त्याची फॉईल तयार होते का? हे पाहावे. जर वर्खाची फॉईल तयार होत असल्यास तो अॅेल्युमिनियमचा असू शकतो. त्यामुळे अशा मिठाईची खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.





