सोनम वांगचुक यांच्या हस्ते 14 ला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण

माजी न्यायमूर्ती भूषण गवई यांची राहणार उपस्थिती

अमरावती/4 नोव्हेंबर – पर्यावरण रक्षणासाठी उपोषण आणि आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेणारे लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे पत्नी गीतांजली वांगचुक यांच्यासह 14 नोव्हेंबरला अमरावती दौर्‍यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते उत्तम नगर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता हा सोहळा होणार असून, यासाठी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रा. सू. गवई स्मारक प्रतिष्ठानच्या वतीने सोनम वांगचुक यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या उपस्थितीत होणार्‍या या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी केलेल्या आंदोलनामुळे देशभरात त्यांची चर्चा झाली होती. त्यामुळे त्यांच्या अमरावती भेटीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमाला माजी प्रधान न्यायमूर्ती भूषण गवई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, डॉ. कीर्ती अर्जुन यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. उत्तम नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पुतळ्याच्या अनावरणासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याने आयोजकांकडून तयारी केली जात आहे.

Back to top button