शहरातील तीन पोलीस निरीक्षकांच्या तडकाफडकी बदल्या
बडनेरा-पुनीत कुलट

नांदगाव पेठ – सतीश पाटील
वाहतूक शाखा – हनुमंत उरलागोंडावार
अमरावती/4 नोव्हेंबर – अमरावती शहर पोलीस दलात प्रशासकीय कामासाठी तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी हे तातडीचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार पुनीत कुलट यांची बडनेरा येथे, सतिष पाटील यांची नांदगाव पेठ येथे आणि हनुमंत उरलागोंडावार यांची शहर वाहतूक शाखा गाडगेनगर येथे नवीन जबाबदारी निश्चित करण्यात आली असून सर्वांना लगेच पदभार घेण्यास बजावले आहे.
पोलीस आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीनंतर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेत हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून आयुक्तांनी प्रशासकीय निकडीपोटी या तात्पुरत्या स्वरूपाच्या बदल्या केल्या आहेत. अचानक झालेल्या या बदलांमुळे पोलीस वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
या आदेशानुसार आतापर्यंत नांदगाव पेठ पोलीस ठाण्याची धुरा सांभाळणारे पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्याकडे आता बडनेरा पोलीस ठाण्याचा पदभार सोपवण्यात आला आहे.
नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सतिष पाटील यांना नांदगाव पेठ पोलीस ठाण्याची महत्त्वाची सूत्रे देण्यात आली आहेत. याशिवाय बडनेरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत उरलागोंडावार यांची बदली शहर वाहतूक शाखा गाडगेनगर येथे करण्यात आली आहे. सर्व अधिकार्यांनी नवीन नियुक्तीच्या ठिकाणी विनाविलंब हजर राहून कारभार हाती घेण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
पोलीस दलात प्रशासकीय फेरबदल
पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयामुळे शहरातील महत्त्वाच्या तीन पोलीस ठाण्यांचा चेहरामोहरा बदलला आहे. कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी आणि दैनंदिन कामकाज सुरळीत चालवण्यासाठी हे अंतर्गत बदल करण्यात आले आहेत. सर्व अधिकार्यांनी त्वरित नवीन ठिकाणी हजर होऊन कामाची सूत्रे हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.





