जिल्ह्यात 3 ठिकाणी सहकार विभागाचे छापे

अवैध सावकारीचा व्यवसाय सुरु असल्याची तक्रार

एका ठिकाणाहून 13 संशयास्पद कागदपत्रे जप्त

अमरावती /2 नोव्हेंबर – जिल्ह्यात अवैध सावकारीचा व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारींची सहकार विभागाने गंभीर दखल घेत एकाच वेळी 3 ठिकाणी छापे टाकले. नांदगाव खंडेश्वर आणि अकोला परिसरात 30 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत एका ठिकाणाहून अवैध व्याज व्यवहाराशी संबंधित 13 संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली. उर्वरित 2 ठिकाणी मात्र आक्षेपार्ह कागदपत्रे आढळली नाहीत. या कारवाईमुळे जिल्ह्यात बेकायदेशीर सावकारी करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.
नांदगाव खंडेश्वर येथील सहायक निबंधक कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांनी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 मधील कलम 3(2) नुसार 3 स्वतंत्र तपासणी पथके तयार केली. पोलिसांच्या मदतीने संबंधित ठिकाणी ही तपासणी करण्यात आली. पहिल्या पथकाने अनिरुद्ध राऊत यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव खंडेश्वर येथील बुधवार चौकातील शुभम ज्वेलर्सचे संचालक श्रीकृष्ण विठ्ठलराव सोळंके यांच्या निवासस्थानी तपासणी केली. मात्र, तेथे संशयास्पद कागदपत्रे मिळाली नाहीत. दुसर्‍या पथकाने सहायक निबंधक सचिन पतंगे यांच्या नेतृत्वाखाली बुधवार चौकातील संबंधित निवासस्थानी झडती घेतली. यावेळी अवैध सावकारीशी संबंधित 13 संशयास्पद कागदपत्रे मिळाल्याने ती जप्त करून सीलबंद करण्यात आली. तिसर्‍या पथकाने सहायक निबंधक रोहिणी विटणकर यांच्या नेतृत्वाखाली अकोला परिसरातील एका महिलेच्या निवासस्थानी तपासणी केली. मात्र, येथेही आक्षेपार्ह कागदपत्रे आढळली नाहीत. जप्त कागदपत्रांची तपासणी सहायक निबंधक सचिन पतंगे हे विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन आणि जिल्हा उपनिबंधक राजेश व्ही. भुयार यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहेत. तपासणीनंतर पुढील कारवाई निश्चित होणार असून, अवैध व्याजाच्या व्यवहारांवर सहकार विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.

Back to top button