मृत्यूनंतर अवयवदानातून पाच जणांना जीवनदान

यजमान सागर बडगे यांची अवयवदानाला संमती

यकृत नागपूरला तर मूत्रपिंड सावंगीला रवाना

नेत्रदानातूनही दोन जणांना मिळणार नवी दृष्टी

अमरावती /28 ऑक्टोबर – शहरातील रिम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत घोषित करण्यात आलेल्या अ‍ॅड. मनीषा सागर बडगे यांच्या अवयवदानातून 5 जणांना नवजीवन मिळण्याची संधी उपलब्ध झाली. पती प्रा. सागर बडगे यांनी दुःखाच्या प्रसंगी अवयवदानाला संमती दिली. त्यांच्या यकृतासह दोन्ही मूत्रपिंड आणि नेत्रदान करण्यात आले. यकृत नागपूरला, तर एक मूत्रपिंड सावंगी मेघे येथे पाठविण्यात आले. दुसर्‍या मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण रिम्स रुग्णालयात गरजू रुग्णावर करण्यात आले. या प्रक्रियेसाठी अमरावती शहर वाहतूक पोलिसांनी विशेष मार्ग उपलब्ध करून दिला.मनीषा बडगे (41) या अमरावतीतील आदर्श नगर, मालटेकडी येथील व्यंकट राव खोब्रागडे यांच्या कन्या आणि जळगावच्या सून होत्या. 17 ऑक्टोबर रोजी आईला भेटण्यासाठी त्या अमरावतीत आल्या असताना कॅम्प मार्गावरील लाहोटी रुग्णालयासमोर शहर बसच्या धडकेत गंभीर जखमी झाल्या. सुरुवातीला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना रिम्सरुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. स्वरूप गांधी यांच्या पथकाने शस्त्रक्रियेसह उपचार केले; मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने प्रकृतीत सुधारणा झाली नाही. दहा दिवसांच्या उपचारानंतर 27 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.41 वाजता त्यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले. यानंतर डॉ. श्याम राठी यांनी कुटुंबीयांशी संपर्क साधून अवयवदानाचे महत्त्व समजावले. पती प्रा. सागर बडगे आणि भाऊ निलेश खोब्रागडे यांनी संमती दिली. नागपूरच्या विभागीय समितीची परवानगी आणि आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर अवयवदानाची प्रक्रिया पार पडली. यकृत नागपूरला पाठविण्यासाठी डॉ. राहुल सक्सेना आणि डॉ. संजय कोलते अमरावतीत आले. रिम्समध्ये गरजू रुग्णावर मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले. ही रुग्णालयातील चौथी मूत्रपिंड प्रत्यारोपणाची प्रक्रिया ठरली. या कामात डॉ. सोहम घोरमाडे, डॉ. दिनेश पहेलजानी, डॉ. हितेश गुल्हाने, डॉ. विशाल बाहेकर, डॉ. राहुल पोटोद, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. प्रतीक घिरडे, डॉ. राहुल घुले, डॉ. रोहित हातगांवकर यांच्यासह वैद्यकीय पथकाने मेहनत घेतली. जीवनज्योतचे अध्यक्ष चंद्रकांतभाई पोपट, डॉ. सिकंदर आडवाणी, सुरेश वसानी, राजूभाऊ मूंढडा, डॉ. पंकज लांडे, डॉ. नंदकिशोर लोहमाणा, पूरणसेठ हबलानी, रवी इंगळे यांनी उपस्थित राहूनकुटुंबीयांच्या निर्णयाचा गौरव केला. हरिना नेत्रदान समितीचे प्रा. मुकेश लोहिया, मनोज राठी, रामप्रकाश गिल्डा, राजेंद्र वर्मा, शरणपालसिंग अरोरा, शरद कासट, रश्मी नावंदर, मोनिका उमक यांचेही सहकार्य लाभले. पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी रुग्णालयाला भेट दिली. दरम्यान, कुटुंबीयांनी छायाचित्रे आणि चित्रफीत घेण्यास नकार देत या दुःखद प्रसंगात गोपनीयता राखण्याचे आवाहन केले.
दुःखातूनही जपली माणुसकीची ज्योत-मनीषा बडगे यांच्या अवयवदानामुळे 5 जणांना नवजीवनाची आशा मिळाली. यकृत नागपूरला, मूत्रपिंड सावंगी मेघे आणि रिम्स रुग्णालयात पाठविण्यात आले. नेत्रदानातूनही दोन जणांना दृष्टी मिळण्यास मदत होणार आहे. पती प्रा. सागर बडगे आणि भाऊ निलेश खोब्रागडे यांनी दुःख बाजूला ठेवून घेतलेल्या निर्णयामुळे अवयवदानाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले.

Back to top button