दुबार पेरणीचे संकट : शेतकर्याने केला आत्मघात
कर्ज काढून केली होती पेरणी

-पाउस नसल्याने होता चिंतातून
-मोर्शीच्या खोपडा गावातील घटना
मोर्शी / 29 जून: महाराष्ट्र बँक आणि बचत गटाचे 2 लाखांचे कर्ज काढून पेरणी तर केली पण पाउस नसल्याने सर्व खर्च वाया जाण्याची भीती आणि आर्थिक तंगी असताना दुबार पेरणीचे संकट समोर दिसत असल्याने चिंताग्रस्त झालेल्या एका 40 वर्षीय युवा शेतकर्याने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना मोर्शी तालुक्यातील शिरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्या खोपडा या गावात घडली. राजकुमार हरिचंद्र संतापे असे मृतक शेतकर्याचे नाव आहे.
राजकुमार संतापे यांच्याकडे खोपडा शेत शिवारात चार एकर शेती आहे. त्यांनी यावर्षी महाराष्ट्र बँकेचे व बचत गटाचे जवळपास दोन लाख रुपये कर्ज काढून आपल्या शेतात सोयाबीन आणि तूर या पिकाची पेरणी केली. मात्र निसर्गाची अवकृपा झाली. पुरेसा पाउस पडत नसल्याने पेरणी वाया जावून दुबार पेरणीचे संकट त्यांना समोर दिसत होते. आधीच डोक्यावर कर्ज असताना पून्हा पेरणीसाळी पैसे कसे जुळवायचे या विवंचनेत राजकुमार संतापे चिंताग्रस्त झाले होते. गेल्यावर्षी सुद्धा त्यांच्यावर अशीच वेळा आली होती. शेतात लागवडीचे पैसे सुद्धा निघाले नव्हते. त्यामुळे ते आर्थिक संकटात होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. याच विमनस्क अवस्थेत राजकुमार संतापे यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
शनिवार, 28 जून रोजी दुपारी त्यांनी आपल्या घरासमोर असलेल्या एका झाडाखाली विष प्राशन केले. काही वेळाने गावकर्यांच्या ही बाब लक्षात आली. लगेच राजकुमार संतापे यांना रुग्णवाहिकेतून मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने राजकुमारला डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचारासाठी अमिरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रात्री 11 वाजताच्या सुमारास राजकुमार संतापे यांची प्राणज्योत मालवली. आज रविवारी शवविच्छेदनानंतर त्यांच्या पार्थिवावर खोपडा येथे अंत्यविधी पार पडला. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.




