पंतप्रधान मोदी, अमित शाहांना सद्बुध्दी द्या
तिसर्या दिवशी इंडिया आघाडीची ‘गांधीगिरी’

खासदारांनी घेतलं बापूंच्या समाधीचं दर्शन
ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात खासदार आक्रमक
नवी दिल्ली /8 ऑक्टोबर : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आज (08 ऑक्टोबर) इंडिया आघाडी सलग तिसर्या दिवशी आक्रमक दिसली. इंडिया आघाडीने 6 ऑक्टोबर रोजी आंदोलनाची घोषणा दिली होती. मात्र पोलिसांनी अडवल्यामुळे खासदारांनी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी म्हणजे सलग दोन दिवस लंच डिप्लोमेसी करत इंडिया आघाडीकडून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. मात्र आज इंडिया आघाडीने आक्रमक न होता गांधीगिरीचा मार्ग निवडला. इंडिया आघाडीच्या खासदारांनी 6 ऑक्टोबर रोजी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत आंदोलन केले. विरोधी खासदारांचे आंदोलन निवडणूक आयोगाच्या दिशेने जात होते. पोलिसांनी इतर खासदारांना अटक केल्यामुळे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आकाशवाणी परिसरात तब्बल 8 तास ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही नेत्यांना अटक केली आणि त्यांची दोन तासांनी सुटका केली. त्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी सलग दुसर्या दिवशी म्हणजे 7 ऑक्टोबर रोजी जनपथ येथील ‘सागर रत्न’मध्ये दुपारचे जेवण केले. जेवणानंतर, सर्व खासदार तीन बसेसमधून जंतरमंतरच्या दिशेने निघाले. मात्र पोलिसांनी त्यांना ‘ले मेरिडियन’ हॉटेलजवळ अडवले. या घटनेदरम्यान आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. त्यानंतर, पोलिसांनी पुन्हा एकदा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वाड्रा यांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला.
इंडिया आघाडीच्या आंदोलनामुळे सलग दोन दिवस दिल्लीतील वातावरण तापले होते आणि त्यातच इंडिया आघाडीने आजही आंदोलनाची हाक दिली होती. त्यामुळे आज पुन्हा एकदा आंदोलन तापण्याची शक्यता होती. दुपारच्या सुमारास इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आंदोलनापूर्वी कनॉट प्लेस येथील ‘मोएट्स’ रेस्टॉरंटमध्ये दुपारचे जेवण केले. इंडिया आघाडीचे खासदार जेवणानंतर आंदोलन करणार असल्यामुळे रेस्टॉरंट आणि परिसराची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी दिल्ली पोलिसांची दोन पथके कनॉट प्लेसच्या ‘के-ब्लॉक’ भागात तैनात करण्यात आली होती.
जेवण झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले की, इंडिया आघाडीचे नेते शांततापूर्ण धरणे आंदोलन करण्यासाठी गांधी समाधीस्थळाकडे जात आहेत. तिथे प्रार्थना केली जाईल आणि भाजप सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सुबुद्धी मिळावी, अशी कामना केली जाईल, जेणेकरून त्यांना हे उमजेल की त्यांचे निर्णय राष्ट्रीय हिताचे नाहीत, असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर इंडिया आघाडीचे खासदार पोलीस बंदोबस्तात राजघाटावर पोहचेल. तिथे पोहचल्यावर मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियांका गांधी-वाड्रा आणि इतर नेत्यांनी महात्मा गांधींच्या समाधीस्थळावर पुष्प अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर काही काळ तिथेच बसून सर्व खासदार माघारी फिरले.





