अंबादेवी नवरात्रोत्सवात व्यावसायिकांना 149 स्टॉलची संधी
संकेतस्थळावर सविस्तर माहिती उपलब्ध

अमरावती /6 ऑक्टोबर-अंबादेवी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेच्या बाजार व परवाना विभागाने राजकमल चौक ते गांधी चौक या मार्गावर तात्पुरते व्यवसायिक स्टॉल उभारण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी मंजूर नकाशानुसार रस्त्याच्या दुतर्फा एकूण 149 खुले प्लॉट उपलब्ध करून देण्यात येणार असून, इच्छुक व्यावसायिकांकडून कोटेशन मागविण्यात आले आहे.
अंबादेवी नवरात्रोत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात भाविक व नागरिकांची गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर विविध वस्तूंची विक्री व व्यवसाय करणार्या व्यावसायिकांना तात्पुरत्या स्वरूपात जागा उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेच्या बाजार व परवाना विभागाने ही व्यवस्था केली आहे. राजकमल चौक ते गांधी चौकपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा मंजूर नकाशानुसार स्टॉलसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी 5 ु 7 फूट आकाराचे म्हणजेच 35 चौरस फूट क्षेत्रफळाचे खुले प्लॉट इच्छुक व्यावसायिकांना वितरित करण्यात येणार आहेत. सदर प्लॉट व्यवसाय करण्यासाठी देण्यात येणार असून, त्यासाठी इच्छुक व्यावसायिकांकडून शासकीय दर रुपये 10541/- + 18% जि.एस.टी. सह जास्तीत जास्त दराचे ऑफर मुल्याचे कोटेशन निविदा मागविण्यात आले आहे. सदर कोटेशनच्या अटी व शर्ती बाजार व परवाना विभागाच्या राजापेठ मनपा हॉटेल ग्रेस इन मागे, झोन क्र. 2, पहिला मजला, अमरावती येथील कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच महानगरपालिकेच्या https://www.amravaticorporation.in या संकेतस्थळावरही यासंदर्भातील माहिती उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. दरम्यान, दुकान/आस्थापना भाड्याने देताना दरवर्षीच्या भाडे शुल्कामध्ये 10 टक्के नैसर्गिक वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यावर लागू असलेला जीएसटी दर निश्चित करण्यात आलेले आहे. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांनी कोटेशन सादर करताना या बाबींची नोंद घेण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
कोटेशन फॉर्मसोबत पुढील वर्षाची आरक्षित पावतीची छायाप्रत, परवाना अनुज्ञप्ती छायाप्रत, लागू असल्यास जीएसटी प्रमाणपत्र आदी आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कोटेशनची रक्कम महानगरपालिकेने नमूद केलेल्या पद्धतीने जमा करणे आवश्यक आहे. महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, कोटेशन फॉर्म सोबत अटी व शर्तींची रु.500/- + 18% जि.एस.टी. रक्कम भरून निर्धा रित दिनांक 06/10 /2026 ते दिनांक 07/10/2026 रोजी दुपारी 5.00 वाजेपर्यंत या कालावधीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सिलबंद कोटेशन दिनांक 08/10/2026 रोजी दुपारी 5.00 वाजेपर्यंत मा.अतिरिक्त आयुक्त-2, बाजार व परवाना विभाग राजापेठ मधील झोन, हॉटेल ग्रेस इनच्या मागे अमरावती या कार्यालयात दाखल करता येणार आहे. तसेच दिनांक 09/10/2026 रोजी 10.00 वाजता मा.अतिरिक्त आयुक्त-2 यांचे कार्यालयात उपस्थितांसमोर उघडण्यात येणार आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे कोटेशन स्वीकारले जाणार नसल्याचेही महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.या प्रक्रियेमुळे नवरात्रोत्सवाच्या काळात व्यवसाय करणार्या लहान व्यावसायिकांना अधिकृत जागा उपलब्ध होणार आहे. महानगरपालिकेचे बाजार व परवाना विभागाने इच्छुक व्यावसायिकांनी विहित मुदतीत कोटेशन सादर करून या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.





