8 दिवसापासून बेपत्ता असलेली युवती तेलंगणात सापडली

भ्रमणध्वनीच्या आधारावर गुन्हे शाखेला लागला तपासाचा सुगावा

अमरावतीत आणल्यानंतर महिला दक्षता समितीसमोर जबाब नोंदवला

अमरावती /5 ऑक्टोबर– शहरातील अंबादेवी मंदिर परिसरातून 27 सप्टेंबरपासून बेपत्ता असलेल्या युवतीचा कोतवाली पोलिसांनी 8 दिवसांनंतर शोध घेतला. युवती तेलंगणातील आदिलाबाद येथे सुखरूप आढळून आली असून गुन्हे शाखा पथकाने तिला अमरावतीत आणले आहे. ती तेलंगणात एकटीच असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र ती तेथे कशी पोहोचली याचा उलगडा अद्याप झालेला नसून तिचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात युवतीला फूस लावून नेल्याचा आरोप झाल्याने तपासाला विशेष महत्त्व आले आहे.युवती बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी तिच्या भ्रमणध्वनीच्या ठिकाणाची माहिती तपासण्यास सुरुवात केली. तिच्या संपर्कातील व्यक्ती, दूरध्वनीवरील संभाषण तसेच अन्य उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांनी तिचा माग काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, युवतीला विशिष्ट समाजातील तरुणाने फूस लावून नेल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्यासह काही जणांनी कोतवाली पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करून युवतीचा शोध घेण्याची तसेच संबंधित तरुणावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला. गुन्हे शाखा पथक या प्रकरणाचा समांतर तपास करीत होते. युवतीच्या भ्रमणध्वनीच्या ठिकाणावरून ती तेलंगणात असल्याचा सुगावा मिळाला. त्यानंतर गुन्हे शाखा पथक तेलंगणातील आदिलाबाद येथे पोहोचले आणि युवतीला सुखरूप ताब्यात घेतले. पोलिसांचे पथक तिला घेऊन सोमवारी अमरावतीत परतले. युवतीला पोलिस उपायुक्त प्रांजली सोनवणे यांच्यासमोर उभे करण्यात आले. तिचा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून महिला दक्षता समितीच्या सदस्यांसमोरही तिची चौकशी करण्यात येत आहे. या जबाबातून युवती तेलंगणात कशी पोहोचली आणि या काळात तिच्यासोबत नेमके काय घडले याची माहिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात शिवराय कुळकर्णी यांनी युवतीवर दबाव टाकून एक चित्रफीत तयार केल्याचा तसेच तिच्याकडून शपथपत्र लिहून घेतल्याचा आरोप केला होता. मात्र या आरोपांची स्वतंत्र पुष्टी अद्याप झालेली नाही. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

Back to top button