नांदगाव खंडेश्वरात वाघाच्या पावलांचे ठसे

शेलू, नटवा, वाघोडा शिवारात कॅमेरे लावले; शेतकर्‍यांमध्ये दहशत

वनविभागाकडून ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा इशारा

नांदगाव खंडेश्वर/4 ऑक्टोबर -तालुक्यातील वाघोडा, शेलू नटवा आणि वाईबोथ शिवारात पट्टेदार वाघाच्या पावलांचे ताजे ठसे आढळल्याने सर्वदूर प्रचंड घबराट पसरली आहे. ऐन खरीप हंगामात शेतातील कामे जोरात सुरू असताना रानावनात वन्यप्राण्याचा वावर उघड झाल्याने शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. वनविभागाने तातडीने घटनास्थळी पोहोचून पाहणी करत परिसरावर करडी नजर ठेवण्यासाठी कॅमेरे बसवले असून संपूर्ण परिसराला सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
वाघोडा शिवारातील शेतकरी सुरेश पु. गवनेर यांच्या शेतात मजुरांना वाघाच्या पायाचे स्पष्ट ठसे सर्वप्रथम दिसले. ही बातमी वार्‍यासारखी पसरताच गावकर्‍यांनी त्वरित वनविभागाला पाचारण केले. अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन ठशांची बारकाईने तपासणी केली असता ते ठसे वाघाचेच असल्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर वाघाचा नेमका मार्ग आणि हालचाली टिपण्यासाठी वनविभागाने संबंधित परिसरात अत्याधुनिक कॅमेरे लावून शोधमोहीम हाती घेतली आहे.
वाघोडा लगत असलेल्या शेलू नटवा येथील शेतशिवारात वाघाच्या ठशांसोबतच रानडुकरांच्या पायाचे ठसेही उमटल्याचे दिसून आले. त्यामुळे भक्ष्याचा पाठलाग करत वाघ या भागात आला असावा असा दाट अंदाज वर्तवला जात आहे. एकाच पट्ट्यात तीनही गावांच्या शिवारात वन्यश्वापदाचा वावर स्पष्ट झाल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे धास्तावला आहे.
सध्या खरीप हंगामातील शेतीची कामे अंतिम टप्प्यात असून शेतकरी आणि शेतमजूर पहाटेपासून संध्याकाळपर्यंत रानात राबत असतात. अशा नाजूक वेळी वाघाच्या उपस्थितीमुळे नागरिकांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. वनविभागाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखूनशेतकर्‍यांनी शेतात एकटे न जाता समूहाने जावे तसेच संशयास्पद हालचाल दिसल्यास जवळ न जाता त्वरित संपर्क साधावा असे स्पष्ट केले आहे. वाघाच्या दहशतीमुळे शिवारात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी भल्या पहाटे आणि तिन्हीसांजेच्या अंधारात शेतात एकटे जाणे पूर्णपणे टाळावे. शेतात काम करताना शेतकरी बांधवांनी समूहाने राहावे. कुठेही संशयास्पद ठसे किंवा हालचाल नजरेस पडल्यास अंगावर न धावून जाता त्वरित वनविभागाला कळवून स्वतःचा आणि इतरांचा जीव वाचवावा. सावधगिरी बाळगणे हाच मोठा बचाव ठरेल

Back to top button