नेपाळमध्ये अडकलेले भाविक उद्या परतणार
विशेष विमानाने पोहोचतील विदर्भातील 112 भाविक

अमरावतीेचे कांचन पांडे व श्याम मारोटकर सुरक्षित
अमरावती /31 ऑगस्ट– नेपाळमध्ये 26 ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले महाराष्ट्रासह विदर्भातील अनेक भाविक अडकले होते. काही भाविकांचा कुटुंबीयांशी संपर्क तुटल्याने घरच्यांची चिंता वाढली होती. मात्र आता परिस्थिती सुधारली असून भाविकांच्या सुरक्षित परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार विदर्भातील 112 भाविक 2 सप्टेंबरला विशेष विमानाने मुंबईत पोहोचणार आहेत. त्यानंतर ते आपापल्या जिल्ह्यांकडे रवाना होतील.
पूर आणि मुसळधार पावसामुळे कैलास मानसरोवर यात्रेतील अनेक मार्ग बंद झाले होते. त्यामुळे काही यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी थांबावे लागले. अमरावती जिल्ह्यातील कांचन पांडे यांचाही काही काळ कुटुंबीयांशी संपर्क होऊ शकला नव्हता. अखेर त्यांनी पती विलास पांडे यांच्याशी संपर्क साधून आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली. कांचन पांडे यांनी आपण काठमांडूला पोहोचत असून 2 सप्टेंबरला विशेष विमानाने मुंबईकडे रवाना होणार असल्याचे सांगितले. बुधवार निवासी श्याम मारोटकर यांच्याशीही जवळपास 2 दिवस संपर्क झाला नव्हता. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत होते. नंतर त्यांनी संपर्क साधून सुखरूप असल्याचे कळविल्याने घरच्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. भाविकांच्या परतीसाठी महाराष्ट्र शासनाचा नियंत्रण कक्ष सतत कार्यरत असून कुटुंबीयांना वेळोवेळी माहिती दिली जात आहे. परिस्थिती सुधारल्याने भाविकांच्या सुरक्षित परतीला वेग आला आहे.
विशेष विमानातून 112 भाविक मुंबईत-विदर्भातील 112 भाविक 2 सप्टेंबरला विशेष विमानाने मुंबईत पोहोचणार असून त्यानंतर त्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यांकडे रवाना करण्यात येणार आहे.




