अनाथ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त

चंद्रशेखर भोयर यांचा समाजाभिमुख उपक्रम

अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळाला लाभ

अमरावती /26 जुलै: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक तथा शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांच्या वतीने अनाथ व गरजू विद्यार्थ्यांसाठी 34 सायकलींचे वाटप करण्यात आले.
समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. या उपक्रमांतर्गत अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शिक्षण घेणार्‍या 34 अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले. शिक्षणासाठी दररोज लांबचा प्रवास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी या सायकली मोठा आधार ठरणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला नवी गती मिळणार आहे. यावेळी चंद्रशेखर भोयर म्हणाले की, समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. प्रत्येक विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात राहावा, त्याच्या स्वप्नांना बळ मिळावे आणि आर्थिक अडचणीमुळे त्याचे शिक्षण खंडित होऊ नये, हीच या उपक्रमामागील प्रेरणा आहे.या कार्यक्रमाला सोनाली भोयर, प्रवीण ठाकरे, महल्ले सर, वानखडे सर, गजानन कराळे, सुरेश गाजरे, निलेश वानखडे, सातपुते सर, संदीप इंगोले, प्रदीप ढोबळे आणि आशिष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.हा उपक्रम केवळ सायकल वाटपापुरता मर्यादित न राहता वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देणारा आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला. उपस्थितांनी चंद्रशेखर भोयर यांच्या समाजहितैषी कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशा सेवाभावी उपक्रमांची परंपरा कायम राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

संबंधित बातम्या

Back to top button