मुदत संपलेल्या ‘फूड पॅकेट्स’ची तारीख बदलून ‘खुलेआम’ विक्री
‘एफडीए’कडून टोळीचा पर्दाफाश, तुर्भे ‘एमआयडीसी’मधून 75 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुंबई /31 ऑगस्ट : अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगवरील एक्सपायरी डेट बदलून ते पुन्हा बाजारात विकणारे एक मोठे रॅकेट नवी मुंबईतील तुर्भे येथे उघडकीस आले आहे. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत तब्बल 75 लाखांहून अधिक किमतीचा मुदतबाह्य साठा जप्त केला असून, याप्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, तुर्भे येथील टीटीसी इंडस्ट्रियल एरियामधील प्लॉट नंबर सी-449 वर असलेल्या ’साधना एंटरप्रायझेस’ या आस्थापनेवर संयुक्त पथकाने छापा टाकला. जयप्रकाश संचूरीराम सिंग आणि जया नवरंग बहादूर सिंग यांच्या मालकीच्या या गोदामात नामांकित कंपन्यांच्या खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये फेरफार केले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. येथे विविध नामवंत कंपन्यांचे खाद्यपदार्थ साठवून त्यांची अनधिकृतरीत्या रिपॅकिंग आणि लेबलिंग करण्याचे काम सुरू होते. यामध्ये प्रामुख्याने उत्पादनाच्या मूळ पॅकेजिंगवरील तारीख व एक्सपायरी डेट पुसून त्यावर नवीन तारीख छापली जात होती. तसेच काही पदार्थांच्या मूळ घटकांवर आणि न्यूट्रिशिअन माहितीवर नवीन स्टिकर लावून ते पुन्हा बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचे उघडकीस आले. अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 आणि भारतीय न्यायसंहिता 2023 मधील विविध कलमांन्वये संबंधित आस्थापनेविरुद्ध तुर्भे पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच, ’साधना एंटरप्रायझेस’चा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे.
मॅगी, चिप्स, कोल्ड्रिंक्स, रेडी-टू-ईट पदार्थांचा समावेश- या कारवाईदरम्यान प्रशासनाने 10 नामांकित निर्यातदार कंपन्यांशी संबंधित तब्बल 4 हजार 942 कार्टन जप्त केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने लेज कंपनीचे क्लासिक सॉल्टेड, मॅजिक मसाला, स्पॅनिश टँगी टोमॅटो, सिजलिंग हॉट, लेमन चिली आणि हॉट अँड स्वीट प्रकारच्या बटाटा चिप्सचा समावेश आहे. तसेच कुरकुरे व फन फ्लिप्सचे विविध मसालेदार प्रकारच्या कॉर्न स्नॅक्स, मॅगी नूडल्स, रसोइ ब्रँडचे पनीर टिक्का मसाला, दम आलू, पनीर भुर्जी आणि नॉर मश्रूम सूप यांसारखे इन्स्टंट नूडल्स व रेडी-टू-ईट अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहेत.




