डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी निधी उपलब्ध करून देणार
आ.संजय खोडके यांचे प्रतिपादन

अमरावती /31 ऑगस्ट– संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात प्रस्तावित असलेल्या बहुप्रतिक्षित ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन’ निर्मितीसाठी आवश्यक असणारा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर भक्कम आणि सकारात्मक पाठपुरावा करू, अशी ग्वाही विधानपरिषद आमदार संजय खोडके यांनी दिली आहे. विद्यापीठातील अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थ्यांना एकाच छताखाली सर्व शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात येणार्या या पाच मजली इमारतीचा प्रस्ताव निधीअभावी कागदावरच अडकला होता. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या प्रतिनिधी मंडळाने आमदार खोडके यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि तातडीने निधी देण्याची जोरदार मागणी निवेदनाद्वारे केली.
विद्यापीठ आवारात विविध अभ्यास केंद्रे कार्यरत असून त्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी अविरत अध्ययन आणि संशोधनाचे कार्य करत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना विविध विषयांचे सखोल ज्ञान, संदर्भ साहित्य आणि दुर्मिळ ग्रंथ एकाच ठिकाणी मिळावेत, यासाठी माजी सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. प्रफुल गवई यांनी आंबेडकर भवनाची संकल्पना मांडली होती. तत्कालीन व्यवस्थापन परिषदेने या संकल्पनेला हिरवा कंदील दाखवत भव्य 5 मजली इमारतीचा नकाशा आणि आराखडा मंजूर केला होता. मात्र, आर्थिक मंजुरीअभावी प्रत्यक्ष बांधकामाची एकही वीट रचली गेली नाही. आमदार संजय खोडके यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत, तरुणाईला प्रेरणा देणार्या या महत्त्वाकांक्षी भवनाचे काम लवकरच मार्गी लावण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.
या महत्त्वपूर्ण बैठकीला डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्र सल्लागार सदस्य प्रा. डॉ. प्रफुल गवई, परीक्षा व मूल्यमापन केंद्र संचालक डॉ. नितीन कोळी, डेटा अमरावती जिल्हाध्यक्ष डॉ. देवलाल आठवले, रमेश कटके, प्राचार्य डॉ. संजय खडसे, डॉ. रवी जुमळे, प्रा. जगदीश गोवर्धन, डॉ. रत्नशील खोब्रागडे, डॉ. वामन जगझाप, प्रवीण मेश्राम, डॉ. रविकांत मैंदकर आणि प्रा. प्रथमेश गवई प्रामुख्याने उपस्थित होते.




