मनपाचा डेंग्यू, मलेरियाविरुद्ध एल्गार

साथीचे आजार रोखण्यासाठी महापालिकेची जंबो मोहीम

अमरावती/27 ऑगस्ट-शहरात डेंग्यू, मलेरिया आणि साथीच्या आजारांचा उद्रेक रोखण्यासाठी अमरावती महानगरपालिकेचा आरोग्य आणि स्वच्छता विभाग पूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे. महापालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व झोन कार्यालये आणि आरोग्य केंद्रांतील अधिकारी-कर्मचार्‍यांची एक तातडीची जंबो बैठक पार पडली. या बैठकीत शहरात साथीचे आजार पसरू नयेत म्हणून आरोग्य आणि स्वच्छता कर्मचार्‍यांनी समन्वयाने काम करत संपूर्ण अमरावती शहरात धडक मोहीम राबवण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत.
वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, स्वच्छता वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव आणि साथीचे रोग नियंत्रण अधिकारी डॉ. रुपेश खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या मोहिमेअंतर्गत महापालिकेची पथके घरोघरी जाऊन पाण्याची भांडी, टाक्या आणि कंटेनरची पाहणी करतील. दूषित आणि अळ्या साचलेले कंटेनर तत्काळ नष्ट केले जातील. साचलेल्या पाण्यात डासांचा नायनाट करण्यासाठी गप्पी मासे सोडणे आणि टेमेफॉस औषधाची फवारणी करण्याची कारवाई सुरू झाली आहे.ज्या भागात तापाचे रुग्ण आढळतील, तिथे औषधफवारणी आणि धूरफवारणी तीव्र करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्याचा अहवाल तातडीने सादर केला जाईल. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेची खात्री करूनच पुरवठा करण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले आहेत. या कामात आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे आणि स्वच्छता अधिकारी डॉ. अजय जाधव यांनी कर्मचार्‍यांना कोणतीही हयगय न ठेवता थेट कारवाई करण्यास सांगितले आहे.साथीचे रोग नियंत्रण अधिकारी डॉ. रुपेश खडसे यांनी सर्व कर्मचार्‍यांना दैनंदिन कामाचा अहवाल सादर करणे अनिवार्य केले आहे. उपआयुक्त वैशाली बोरेकर यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांनी या मोहिमेची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असून शहरात स्वच्छता राखण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button